दुर्देवी ! ना पाऊस ना सोसाट्याचा वारा तरी झाड कोसळल्याने रिक्षाचालकासह प्रवाशाचा मृत्यु

ठाणे : अपघात कसा व कोठे होईल अन मृत्यु कोणावर कशी झडप घालेल याच काहीही नेम नाही असे सांगितले जाते. त्याचा अनुभव ठाण्यात सर्वांना आला. ना पाऊस, ना सोसाट्याचा वारा तरीही एक झाड अचानक कोसळले अन त्यात दोघांना आपला प्राण गमवावा लागला.

मासुंदा तलाव येथे धावत्या रिक्षावर झाड उन्मळून पडल्याने त्यात रिक्षाचालकासह एक प्रवासी अशा दोघांचा जागीच मृत्यु झाला. ठाण्यातील डॉ. मूस रोड येथे बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली.

डॉ़ मूस रोडवर एक रिक्षा जात असताना अचानक एक झाड या रिक्षावर कोसळले. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी रिक्षावर पडलेल्या झाडाच्या फांद्या तातडीने दूर करण्यास सुरुवात केली. फांंद्या दूर केल्यावर आत पाहिले असता रिक्षात चालक व एक प्रवासी आढळून आला. दोघांचा जागीच मृत्यु झाला असल्याचे आढळून आले. या दोघांची रात्री उशिरापर्यंत ओळख पडली नव्हती.