माळशिरस येथे कोरोना रुग्णांना वृक्ष भेट, राष्ट्रतेज प्रतिष्ठानचा उपक्रम

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे पूर्व भागातील कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. माळशिरस गावातील कोविड केअर सेंटरमधून बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांना माळशिरस ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रतेज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र गद्रे यांचेकडून आंबा व रामफळ या फळांच्या झाडांची रोपे भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

सदर कोविड सेंटर मधून बरे होऊन घरी जाणाऱ्या सर्व रुग्णांना राजेंद्र गद्रे यांचेकडून फळांची झाडे दिली जाणार आहेत. करोनामुक्त झालेल्या रुग्णांना ह्या झाडांचे रोपण करून त्याची संवर्धन करण्याची जबाबदारी, एक आठवण म्हणून तसेच ऑक्सिजन निर्मितीसाठी, सावली देण्यासाठी व सदर झाडांपासून मिळणाऱ्या फळांचा त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आस्वाद घेता येईल असा उद्देश त्यामागे आहे. राष्ट्रतेज प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमीच जास्तीत जास्त झाडांच्या रोपांचे वाटप, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन हे उपक्रम माळशिरसमध्ये राबविले जाऊन एक सामाजिक बांधिलकी जोपासली जाते.

यावेळी कै. तानाजी (आप्पा) यादव ट्रस्टचे अध्यक्ष अरुण यादव, टेकवडी गावचे उपसरपंच सुरज गदादे, सामाजिक कार्यकर्ते प्रविण कदम, आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.