यवतमाळ पोलीस मुख्यालयात थरार; स्वत:चा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न

पोलिसनामा ऑनलाईन, यवतमाळ : कळंब तालुक्यातील 21 लाखांच्या वाटमारीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या आरोपीने यवतमाळ पोलीस मुख्यालयात स्वत:चा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडलीय. ही घटना सोमवारी सायंकाळी 7 वाजता घडली असून या घटनेने जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे.

विशाल रामचंद्र मानेकर (24, रा. जरीपटका, नागपूर) असे आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या संशयिताचे नाव आहे.

कळंब -राळेगाव मार्गावर सावरगाव शिवारात व्यापार्‍याला अडवून त्याच्याकडून सुमारे 21 लाखांची रोकड आरोपींनी लंपास केली. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहेत.

या प्रकरणात त्यांनी आतापर्यंत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. मोहदा, हिंगणघाट आणि नागपूर येथील संशयितांचा यात समावेश आहे. पोलिसांनी हा गुन्हा जवळपास उघड केलाय. मात्र, चोरीला गेलेली रोख रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न सुरूय.

नागपुरात कुख्यात असलेल्या विशाल याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे जवळपास स्पष्ट झालंय. पोलीस आपल्याकडून रोख रक्कम वसूल करतील, या भीतीने त्याने संधी साधून धारदार वस्तूने स्वत:चा गळा कापून घेतला. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याने पोलिसांनाही धक्का बसला. त्यांनी विशालला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्याच्या गळ्याला टाके घातले आहेत.

आता त्याची प्रकृती सद्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, घटनाक्रमानंतर त्याच्याभोवती पोलीस कर्मचारी होते. संशयिताच्या या कृत्याने पोलीस कर्मचारी हादरलेेत.

पोलीस बरेचदा गुन्हा उघड करण्यासाठी आरोपींना ताब्यात घेऊन ठेवतात. त्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर आरोपींना अटक दाखवून न्यायालयात हजर करतात. याशिवाय सराईत गुन्हेागार कबुली देत नाही. अशा स्थितीत वरिष्ठांनी जबाबदारी घेण्याची आवश्यकता असते. तथापि, यात सध्या तरी कर्मचारी बाजू सांभाळताना दिसले. आता या घटनेच्या चौकशीत काय निष्पन्न होते? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

वाटमारीच्या गुन्ह्यात मोहदा येथे रहिवासी आणि यवतमाळात कृषी महाविद्यालयात शिकणार्‍या युवकाने हा वाटमारीचा कट रचल्याचे पुढे आलंय. मात्र, त्याला अजून आरोपी बनविण्यात आलेले नाही. त्याने एकतर्फी प्रेमातून युवतीच्या अंगावर फेकलेले 3 लाख पोलिसांनी जप्त केलेत. याशिवाय इतर 3 आरोपींना ताब्यात घेतले असून हिंगणघाट येथील संशयिताने वाटमारीच्या पैशांतून वाहन खरेदी केले आहे, अशी चर्चा आहे.