पेटीएमवर लवकरच येणार ‘ही’ नवीन सुविधा

दिल्ली : वृत्तसंस्था – पेटीएम वापणाऱ्या युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. इ वॉलेट कंपनी पेटीएमने हॉटेल बुकिंग अ‍ॅप विकत घेतलं आहे. त्यामुळे आता पेटीएम अ‍ॅपवरून लवकरच ग्राहकांना हॉटेल्स बुक करता येणार आहे. ‘नाइट स्टे’ हे प्रसिद्ध हॉटेल बुकिंग अ‍ॅप पेटीएमनं विकत घेतलं आहे. ग्राहकांना अधिक तत्परतेनं हॉटेल बुकिंग करता यावं असा कंपनीचा मानस असणार आहे. विशेष म्हणजे समोर आलेल्या माहितीनुसार, आपल्या नव्या व्यवसायात पेटीएम कंपनीनं तब्बल ५०० कोटी रुपये गुंतवले आहेत.

पेटीएमनं दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना त्यांच्या बजेटनुसार वेगवेगळे हॉटेल्स उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न पेटीएमचा असणार आहे. शिवाय पहिल्या टप्प्यात जवळपास पाच हजारांहून अधिक लक्झरी आणि स्वस्त दरातील हॉटेल्सचं बुकिंग या अ‍ॅपद्वारे करता येणार आहे हे विशेष. बुकिंग साइट लाँच झाल्यानंतर काही काळात हा आकडा वाढत जाणार आहे असेही समजत आहे. बुकिंग साइट लाँच झाल्यानंतर ५० हजार नवीन हॉटेल्स या अ‍ॅपद्वारे जोडली जातील अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पेटीएम कंपनीने सरोवर, जूरी, ट्रीबो, इंडियो हॉटेल कंपनी जिंजर, स्टर्लिंग वीरिसॉर्ट्स सारख्या हॉटेल्स चेनशी भागीदारी केली असल्याचं समजत आहे. कारण २०२० पर्यंत आशियातील सर्वात मोठी हॉटेल्स बुकिंग साईट म्हणून पेटीएम ओळखलं जावं असा कंपनीचा मानस आहे असेही समजत आहे.