प्रलंबित विविध मागणीसाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा प्रांतकार्यालयावर भव्य मोर्चा

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्यावतीने शिवतिर्थाजवळील कल्याण भवन जवळ आदीवासी स्त्री-पुरुष, वृध्द, लहानमुलांनी एकत्र जमत विविध मागण्यांसाठी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.

सविस्तर माहिती की, आदीवासींना शासनाकडुन वेळोवेळी मागणी करुनही दुर्लक्ष केले जाते. या करीता शासनाचा निषेध करत मागण्या मान्य होत नाही तो पर्यत आज प्रांत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा निर्धार करण्यात आला. रिपरिप पावसात दोन दोन रांगा करत आदीवासी बांधवांनी शिस्तबध्द पध्दतीने रांगेत मोर्चाला सुरवात केली. मोर्चा शिवतिर्थ, रणगाडा चौक असे वळण घेत अब्दुल हमीद स्मारक मार्ग, पालेशा महाविद्यालय, वनविभाग कार्यालय, लेनिन चौक, फाशी पुल, महात्मा फुले यांच्या पुतळ्याला हार अर्पण करुन तेथून पोलीस मुख्यालय, बारा पत्थर चौक, खंडेराव बाजार, पाचकंदिल चौक, शहर पोलीस चौकी, सराफ बाजार, कराचीवाला चौक, जुनी महानगरपालिका, झाशी राणी चौक, प्रांत कार्यालयासमोर मोर्चात आदीवासी बांधवांनी विविध मागणीचे फलक घेऊन ‘सरकार तो हमसे डरती है, पोलीस को आगे करती है’, ‘मागण्या आमच्या हक्काच्या’,  ‘आमु अख्खा एक है’, घोषणा देत मोर्चा प्रांत कार्यालय येऊन धडकला. प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

1) अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी  वनहक्कांची मान्यता) अधिनियम 2006, नियम 2008 व सुधारित नियम 2012, पंचायत विस्तार (पेसा) अधिनियम 1996 ची योग्य अंमलबजावणी करणे.

2) आदीवासी हक्क संपविणारे प्रस्ताविक विधेयक 2019 तात्काळ रद्द करावे.

3) शासन निर्णय 2016/ प्र.क्र.124/का-14 दि. 11 नोव्हेंबर 2016 च्या परिपत्रकानुसार राहुन गेलेले दावे दाखल करणे.

4)शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी, दुष्काळ निधी त्वरीत मिळावी.

5)सर्व पिकांना पिकविमा उतरावा त्वरीत विमा शेतकऱ्यांना देणे.

6)डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तात्काळ कार्यवाही करणे.

7) उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे 10 आदीवासींवर हल्ला करुन खुन करणाऱ्या उच्च जातीय गुंडांवर कडक कारवाई करण्यात यावी.

अशा एकुण यासह 32 मागण्यांसाठी निवेदन वाचन करुन कार्यालयासमोर जोरदार घोषणा देत परिसर दणाणुन सोडला. या अगोदर ता. साक्रीतही याच प्रमाणे मोर्चा काढुन निषेध करत निवेदन देण्यात आले होते. शासनाने दुर्लक्ष केले तर या पुढे आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशार देण्यात आला.

प्रांत अधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी भिमराज दराडे यांना आदीवासींच्या 32 मागणीचे निवेदन देत न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी मोर्चाचे नेतृत्व करणारे कॉ. किशोर ढमाले, कॉ. सुभाष काकुस्ते, कॉ. वंजी गायकवाड, कॉ. रतन सोनवणे, कॉ. सुरेश मोरे, कॉ. मन्साराम पवार, कॉ. मेरुलाल पवार, कॉ.नबाबाई सोनवणे, कॉ. निलाबाई सोनवणे, कॉ. झिपा सोनवणे यांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने आदीवासी बांधव उपस्थित होते.