स्वतःच्या शेवटच्या ट्विटमध्ये मनोहर पर्रिकर म्हणतात..

पणजी : वृत्तसंस्था – एक आयआयटी इंजिनिअर असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर कायम सोशल मीडियावर सक्रिय असायचे .  अगदी शेवटपर्यंत ते सोशल मीडियावर सक्रिय होते .  ट्विटरवर ते नेहमी अपडेट असायचे . पाच दिवसांपूर्वीच त्यांनी शेवटचं ट्विट केलं होतं . विशेष म्हणजे शेवटच्या ट्विटमध्येही पर्रीकरांनी भाऊसाहेब नावानं प्रसिद्ध असलेले गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांची आठवण काढत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती.

भाऊसाहेबांच्या जयंतीनिमित्त पर्रिकरांनी ट्विट केलं होतं .  आपल्या ट्विटमध्ये पर्रिकर म्हणतात की , “गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद (भाऊसाहेब) बांदोडकरांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करतो . गोव्याच्या प्रगतीचा मजबूत पाया रचण्यासाठी भाऊसाहेब यांनी अमूल्य योगदान दिलं आहे.”

भाऊसाहेब हे 1963 मध्ये गोव्याचे पहिले मुख्यमंत्री झाले . भाऊसाहेब महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे नेते होते .  मुख्य म्हणजे ते 1973 पर्यंत लागोपाठ तीन वेळा ते गोव्याचे मुख्यमंत्री राहिले .  भाऊसाहेब यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी शशिकला काकोडकर यांना मुख्यमंत्री करण्यात आलं . ज्या गोव्याच्या एकमेव महिला मुख्यमंत्री राहिल्या आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर हे स्वादुपिंडाशी संबंधित कर्करोगाशी झुंज देत होते . पर्रिकर हे 63 वर्षांचे होते . रविवारी संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला .  त्यांच्या मागे दोन पुत्र , सुना , नातवंडे असा परिवार आहे . काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले होते . पर्रिकरांच्या निधनामुळे सोमवारी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी , काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी , सरचिटणीस प्रियांका गांधी , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , भाजपाध्यक्ष अमित शहा , उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे , उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक , काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे , शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.