सासरवाडीत लोखंडी सत्तूरने पत्नीच्या खुनाचा प्रयत्न

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – सासरवाडीत जाऊन लोखंडी सत्तूरने पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केला. मात्र तिने वार हुकविल्याने मुलाच्या डोळ्यावर जखम झाली आहे. तसेच एअर पिस्टलने हवेत फायरिंग करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे ही खळबळजनक घटना घडली.

याप्रकरणी पती संतोष मारुती वाबळे, दत्तात्रय नजू हिंगडे (दोघे. रा. वासुंदे, ता. पारनेर) व त्याच्या इतर 5-6 साथीदारांविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, संतोष वाबळे व त्याच्या पत्नीचे वाद सुरू आहेत. पत्नी वंदना वाबळे ही सध्या माहेरी राहते. शनिवारी संतोष वाबळे हा मुलगा साईराज याला घेऊन त्याच्या साथीदारांसह स्कार्पिओ गाडीतून खडकवाडी येथे सासुरवाडीत आला. ‘तू आत्ताच नांदायला चल’, असे म्हणून पत्नी वंदना हिचा हात धरून संतोष तिला ओढत घेऊन जाऊ लागला. त्यावर पत्नी समजावून सांगत असताना तिला राग आला.

तुला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणून त्याने लोखंडी सत्तूर पत्नीच्या दिशेने मारून खुनाचा प्रयत्न केला. मात्र पत्नी वंदना हिने वार हुकविल्याने तो वार मुलगा साईराज याच्या डोळ्याच्यावर लागला. त्यामुळे मुलगा गंभीर जखमी झाला आहे. सदर भांडण मिटवण्यासाठी वंदना हिची आजी, आत्या, भावजयी व इतर नातेवाईक आले असता त्यांनाही लाकडी दांडक्याने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली. तसेच एअर पिस्तूलमधून हवेत फायरिंग करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात पत्नी वंदना साबळे यांच्या फिर्यादीवरून पती व तिच्या साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भुजबळ या करीत आहेत.