ममतांचा अजून एक आमदार भाजपच्या गळाला ; दीदीच्या टेन्शनध्ये वाढ

बंगाल : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला एका नंतर एक हादरे बसत आहेत. तृणमूल काँग्रेसचे आमदार मुनीरुल इस्लाम यांनी बुधवारी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या सोबत तृणमूल काँग्रेसचे गदाधर हाजरा, मोहम्मद आसिफ इकबाल आणि निमई दास या नेत्यांनी देखील भाजपचे सदस्यत्व घेतले आहे. एवढेच नाही तर भाजपने दावा केला आहे की, पुढल्या काही दिवसात तृणमूल काँग्रेसचे अजून ६ आमदार पक्ष सोडणार आहेत.

अशाप्रकारे तृणमूल काँग्रेसला एका नंतर एक झटके बसत असल्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या तणावात वाढ झाली आहे. मंगळवारीच तृणमूल काँग्रेसचा एक आमदार आणि मोठ्या संख्येने जिल्हा परिषद सदस्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या बरोबर काँग्रेस आणि मार्क्सवादी पक्षाच्या प्रत्येकी एक आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी म्हणजे आज भाजपमध्ये प्रवेश केलेले मुनीरुल हे वीरभूमी जिल्ह्यातील लबपुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांना भाजपच्या राष्ट्रीय महामंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी भाजपात आणले. तर गदाधर हाजरा हे तृणमूल काँग्रेसच्या वीरभूमी जिल्ह्याच्या युथ विंगचे अध्यक्ष आणि माजी आमदार राहिले आहेत.

पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे राष्ट्रीय महामंत्री कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, बंगालमध्ये आज ज्या प्रकारे दहशतीचे राजकारण चालू आहे त्यामुळे तृणमूल काँग्रेस पक्षात खूप असंतोष आहे. ते म्हणाले की, दीदी (ममता बनर्जी) च्या अहंकारामुळे तृणमूल काँग्रेसमध्ये काम करताना नेत्यांना स्वातंत्र्य मिळत नाही म्हणून तृणमूल काँग्रेसमधील नेत्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील विश्वास वाढत आहे.

पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्या विधानसभेची तयारी भाजपने आतापासूनच केल्याचे यावरून दिसून येत आहे.