शेतीच्या वादातून झालेल्या तुंबळ हाणामारीत तिघांचा मृत्यू, बीड जिल्हयातील खळबळजनक घटना

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपळगव्हाणच्या शिवारात शेतीच्या वादातून रक्ताच्या नात्यातीलच लोकांनी मृत्युचा खेळ खेळत तुफान हाणामारी केली. यावेळी झालेल्या मारहाणीत दोघांचा जागीच तर एकाचा जिल्हा रूग्णालयात मृत्यु झाला असून पोलिस अधिक्षक हर्षद पोद्दार यांनी घटनास्थळी व जिल्हा रूग्णालयामध्ये चोख पोलिस बंदोबस्त लावला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, बीड व पिंपळगव्हाणच्या शिवावर बालेपीरपासून जवळ असलेल्या जमिनीच्या वादातून आज रक्ताचे नाते एकमेकांना भिडले आणि शेतातल्या बंद घरात रक्ताचा सडा पडला. सकाळी 9.30-10 वाजण्याच्या दरम्यान बीड ग्रामीण पोलिसांना घटनास्थळावरूनच एका जखमीने फोन करून माहिती दिल्यामुळे घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांना अंगावर काटे आणणारे चित्र दिसले.

जखमी असलेल्या तिघाजणांना पोलिसांनी त्यांच्याच गाडीतून जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल केले. परंतू उपचारा दरम्यान एका जखमीचा मृत्यु झाला. ज्या शेताचा वाद होता त्याच शेतामध्ये विटांनी बांधलेले लोडबेरिंगचे घर आहे. याच घरा जवळ नात्यातीलच लोकांनी एकमेकांवर हल्ला केला असावा. घराच्या दारापासून जवळच एक मृतदेह पडल्याचा तर दुसरा मृतदेह घरापासून जवळच शेतात पडलेला असल्याचे पोलिसांना दिसून आले.

दरम्यान, पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी धाव घेतली. घडलेला प्रकार मोठा आणि गंभीर असल्यामुळे शेतातही मोठा पोलिस बंदोबस्त लावला होता. दरम्यान जिल्हा रूग्णालयातही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी भेट दिली व जखमी ज्या वार्डामध्ये दाखल आहेत त्या वार्डाला आणि शवविच्छेदन गृहाकडे जाणार्‍या रस्त्यावरही पोलिस तैनात केले असून जखमींना कोणालाही भेटू दिले जात नाही.

12 एकर जमीनीचा वाद

बीड शहरातील बालेपीर भागात असलेल्या ईदगाहपासून पवने यांची 12 एकर जमीन आहे. या जमिनीचा वाद न्यायालयापर्यंत पोहचला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगबाद खंडपीठाकडून अ‍ॅड.कल्पेश पवने यांच्या बाजुने निकाल आला होता. त्यामुळेच काल अ‍ॅड.कल्पेश पवने यांनी बीड ग्रामीण पोलिसामध्ये तक्रारी अर्ज देवून मला शेतीमध्ये नांगरटी करण्यासाठी विरोध केला जात असल्याचे त्या तक्रारी अर्जात नमुद करण्यात आले होते.

आरोग्यविषयक वृत्त –