तिहेरी तलाकच्या विरोधात सरकारची केली जाऊ शकते कोंडी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेत २४५ विरुद्ध ११ अशा फरकाने पारित केलेले तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत फेटाळून लावण्यासाठी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी कंबर कसली आहे. त्यांनी २८ डिसेंबर रोजीच राज्यसभेच्या सभापतींना पत्र लिहून हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे चिकित्सा करण्यासाठी पाठवावे असे म्हणले आहे. त्याच प्रमाणे लोकसभे प्रमाणे भाजपला राज्यसभेत बहुमत नसल्याने हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागण्याची शक्यता आहे.

राज्यसभेत आज दुपारी २ वाजता हे विधेयक मांडले जाणार आहे. त्यामुळे या विधेकाचा कडाडून विरोध करण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.  तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर भाजपला रोखून मुस्लिम मतदारांची पसंती आपल्या पक्षाकडे वळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे तर कोणत्याही परिस्थिती आपण आज हे विधेयक राज्यसभेत सम्मत करायचेच असा भाजपने चंग बांधला आहे. विधेयकाच्या विरोधात १२ पक्षांना काँग्रेसने एकत्रित केले असून या बारा पक्षांच्या बळावर आपण या विधेयकाला फेटाळून लावू असे काँग्रेसला वाटते आहे. या १२ पक्षांमध्ये तेलगू देसम पार्टी, तेलंगणा राष्ट्र समिती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या सहित समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी या पक्षांचा समावेश आहे. त्याच प्रमाणे आम आदमी पार्टीचे खासदार हि विधेयकाला विरोध करणार आहेत.

भाजपसाठी आज दुविधा हि असणार आहे कि तिहेरी तलाक विधेयकाच्या विरोधात बसणाऱ्या बारा पक्षात डीएमके आणि एडीएमके  यांचा हि समावेश आहे. त्यांच्या मतावर भाजपने आज तागायत बरीच विधेयके राज्यसभेत पास करण्याची कसरत केली आहे. संसदीय कामकाजाच्या नियमा प्रमाणे सभापती विधेयक मांडण्याची सुरुवात करण्यापूर्वी या विषयाच्या संदर्भात त्यांच्या कडे आलेल्या प्रस्तावाची माहिती सभागृहाला देतात आणि तदनंतरच विधेयक संसदेत मांडण्यात   येते आणि त्या विधेयकाला अनुरूप चर्चा सभागृहात करून नंतर विधेयक मतदानासाठी टाकण्यात येते. भाजपने हे विधेयक मंजूर करण्यासाठी आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावली आहे. हे विधेयक मंजूर होणार का फेटाळले जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.