‘कोरोना’मुळं बांधकाम व्यवसायावरही ‘अवकळा’, मजूर होताहेत स्थलांतरित : बाळासाहेब मालुसरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ‘करोना’ व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे 22 मार्चपासून देशभर लॉकडाऊन असून, सर्व उद्योग, व्यवसाय आणि कंपन्यांसह सर्व्च व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा फटका सर्व व्यवसायांना बसत आहे. याला बांधकाम क्षेत्रही अपवाद नाही. त्यामुळे येत्या काळात घरांच्या किमती वाढण्याची शक्यता कमी आहे. लवकर परिस्थिती नियंत्रणास आली तर वर्षभर तरी घरे, जागांच्या किमतीत वाढ होणार नसून घरांच्या किमती स्थिर राहतील. परंतु, सध्या बांधकामे सुरू असलेली घरे पूर्ण करण्याचे आव्हान बांधकाम व्यवसायिकांसमोर आहे. तसेच साहित्याच्या वाढत्या दराने चिंता मात्र वाढविली असल्याचे मत हडपसर आणि परिसरातील बांधकाम व्यवसायिकांनी व्यक्त केले आहे. ‘करोना’मुळे सर्वच क्षेत्रांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे मुंबई, पुणे येथील मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किमती घसरणार असल्याचे अहवाल आले आहेत.

पुणे शहरासह उपनगरात काय परिस्थिती असेल हे हडपसरमधील बांधकाम व्यवसायिकांकडून जाणून घेतली आहे. पुणे शहराच्या पूर्व भागातील हडपसर, मगरपट्टा, अमानोरासिटी, मुंढवा, केशवनगर, मांजरी, शेवाळेवाडी, लोणी काळभोर, फुरसुंगी, उरुळी देवाची, उरुळी कांचन परिसरात घरांची बांधकामे जास्त आहेत.. त्यात रो-हाऊस, बंगलो अशी बांधकामांचे प्रमाण अधिक आहे. अपार्टमेंटची बांधकामे कमी आहेत. ‘मोठ्या शहरात जास्त घरे बांधून तयार आहेत. त्यामुळे घरे विकली न गेल्यास ती पडून राहत आहेत. बुकिंग केल्यानंतर बांधकामे सुरू केली जातात. त्यामुळे मागणी तसा पुरवठा केला जातो. तसेच, सध्या मोकळ्या जागांच्या किमती स्थिर आहेत. त्यामुळे सर्व विचार केल्यास सध्या वर्षभर तरी घरांच्या किमती स्थिर राहतील,’ असे बांधकाम व्यवसायिक बाळासाहेब मालुसरे यांनी स्पष्ट केले.

‘सध्या परराज्यातील श्रमिक आपल्या गावी निघून गेले आहेत. हे श्रमिक बांधकाम साइटवर राहूनच कामे करतात. हडपसर परिसरामध्ये बांधकामांच्या ठिकाणी काम करणाऱ्या श्रमिकांमध्ये २५ टक्के श्रमिक बिहार व उत्तर प्रदेशमधील आहेत. आता स्थानिक श्रमिकांना घेऊन अपूर्ण बांधकामे पूर्ण केली जाणार आहेत. नवीन घरांसाठी बुकिंग मात्र होत नाही. त्याचा मात्र भविष्यात फटका बसेल. ‘करोना’ची परिस्थिती लवकर नियंत्रणास आल्यास दिवाळी, दसरा या सणाच्या कालावधीत घरांची मागणी वाढेल, अशी आशाही अनेक बांधकाम व्यवसायिकांनी व्यक्त केली. दरम्यान, बँकांकडून कर्ज घेत अनेक प्रकल्प पूर्ण केले आहेत. एका बाजूला कर्जाचा डोंगर वाढत आहे, तर दुसरीकडे घरे तयार असूनही विकली जात नाहीत. त्यामुळे बांधकाम व्यवसायावरही कोरोनाचे सावट पसरल्याचे म्हणावे लागत आहे, त्यांनी सांगितले.

साहित्याच्या किमती वाढतच आहेत

‘करोना’नंतर मात्र सिमेंट, स्टील, वीट या साहित्याच्या किमतीत मात्र अचानक वाढत आहेत. अडीचशे रुपयांची सिमेंटची गोणी साडेतीनशे रुपयांपर्यंत गेली आहे. सिमेंट निर्मितीचे कारखाने बंद असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच स्टीलच्या किमतीत वीस टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे अपूर्ण घरे पूर्ण करण्यासाठी महाग साहित्य खरेदी केले जात आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायिकांचा नफा कमी होणार आहे. स्टील, सिमेंट कारखाने सुरू झाल्यानंतर साहित्याच्या किमती कमी होतील, त्यानंतर नवीन बांधकामे सुरू होणार आहेत. तोपर्यंत परराज्यातील श्रमिक पुन्हा येतील, असे बांधकाम व्यवसायिकांचे म्हणणे आहे.

पुणे शहर परिसरात अनेक घरांची बांधकामे सुरू आहेत. बांधकामांवरील श्रमिक आपल्या गावी गेले असले, तरी स्थानिक श्रमिकांकडून बांधकामे सुरू होत आहेत. त्यात अपूर्ण बांधकामे पूर्ण केली जाणार आहेत. घरांचे बुकिंग होत नसल्याने सध्या तरी नवीन प्रोजेक्ट सुरू होणार नाहीत. घरांच्या किमती वर्षभर तरी स्थिर राहतील. त्यात स्वस्तात घरांची बांधकामे सुरू आहेत. परंतु, ‘करोना’चा प्रादुर्भाव आणखी वाढल्यास मात्र आर्थिक परिस्थिती खराब झाल्यानंतर घरांच्या किमती कमी होऊ शकतात. परंतु, सध्या तशी परिस्थिती नाही.

– बाळासाहेब मालुसरे, बांधकाम व्यावसायिक