गॅस कंटेनरमधून गळती झाल्याने मुंबईकडील वाहतूक विस्कळीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- बंगलुरु-मुंबई महामार्गावर गॅस कंटेनरमधून गॅस गळीत होऊ लागल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. हा अपघात शनिवारी सकाळी सव्वा सहा वाजता नवले पुलाजवळ घडला. अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्नाची शर्थ करुन ही गळती काही प्रमाणात बंद करण्यात यश मिळविले असून आता वाहतूक हळू हळू सुरळीत होत आहे.
याबाबत अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले की, बॉयलरसाठी वापरण्यात येणारा प्रॉपलीन गॅस घेऊन कंटेनर मुंबईकडे जात होता. सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास शेजारुन जाणाऱ्या वाहन या कंटेनरला घासून गेला. त्यामुळे या कंटेनरमधून गॅसची गळती सुरु झाली.

प्रॉपलीन हा रंगहीन इंधन गॅस असून त्याला उग्र वास असतो. हे इंधन गॅस अत्यंत ज्वलनशील आणि गैर विषारी आहे. गॅसोलीनच्या शुद्धीकरणादरम्यान प्रॉपलीन हे इंधन मिळते. या गॅसची गळती झाल्याने परिसरात उग्र वास पसरला. त्यामुळे आजू बाजूचे लोक घाबरले. अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच त्यांची गाडी घटनास्थळी पोहचली. या गाडीमध्ये टॉम्प कार्ड असते. त्याद्वारे मुंबईतील तज्ञांशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी सांगितलेल्या उपाय योजनेनुसार अग्निशामक दलाने गाडीतील लाकडाची पुट्टी या गळतीच्या जागी मारुन गळती रोखण्याचा प्रयत्न केला.ही गळती मोठ्या प्रमाणावर कमी झाली. आता जेथून गळती होत आहे. त्या ठिकाणी प्लॅस्टर आॅफ पॅरिसचा लेप लावून ती गळती बंद करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

या गळतीमुळे साताराहून मुंबईकडील वाहतूक बराच काळ वाहतूक ठप्प झाली आहे. आता कंटेनर बाजूला घेतला असून तब्बल दोन तासानंतर साडेआठच्या सुमारास वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

मेट्रोचा सिमेंट मिक्सर पलटला

वाडिया कॉलेज ते जहांगीर हॉस्पिटलच्या रस्त्यावर पहाटे मेट्रोचा १६ टनी सिमेंट मिक्सर उलटल्याने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मेट्रोच्या खांब उभारण्याचे काम सुरु आहे. त्या ठिकाणी वळविताना सकाळी साडेसहा वाजता सिमेंटचा मिक्सर पलटला. हा मिक्सर रस्त्यावरच आडवा झाल्याने संपूर्ण रस्ता अडला गेला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी एका बाजूची वाहतूक वळविण्यात आली आहे. दोन तासानंतरही मिक्सर बाजूला काढण्याचे काम सुरु होते. या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही.