TRP Case : मुंबई पोलिसांच्या तपासावर HC नाराज, म्हणाले – ‘आणखी किती दिवस तपास चालणार ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीआरपी घोटाळा प्रकरणातील पोलिसांच्या तपासाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तपासाला 3 महिने उलटूनही मुंबई पोलिसांकडे रिपब्लिक टीव्हीविरोधात कोणतेही पुरावे नाहीत, आणखी किती दिवस हा तपास सुरु राहणार ? असा सवाल उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना केला आहे. या प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईला एआरजी आउटलायर मीडियाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. रिपब्लिक टीव्ही व कर्मचा-यावरील कारवाई रद्द व्हावी अशी मागणी एआरजीने केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर होती. दरम्यान या याचिकेवरील पुढील सुनावणी न्यायालयाने येत्या गुरुवारी ठेवली आहे.

या प्रकरणी आजपर्यत मुंबई पोलिसांनी 2 दोषारोपपत्रे दाखल करूनही त्यात त्यांच्याविरुध्द काहीही पुरावे नाहीत असे वाटते. हा एफआयआर ऑक्टोबर 2020 मधील आहे. आता आपण मार्च 2021 मध्ये आहोत. या प्रकरणात खिचडी पक रही है. त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार का ठेवावी?. गेल्या 3 महिन्यांपासून तपास करूनही तुमच्याकडे त्यांच्याविरोधात काहीही पुरावे नाहीत. आपल्यावर काहीतरी कारवाई होईल, या भीतीपोठी तपासात उशिर होतोय का असेही न्यायालयाने म्हटले आहे. संपादक अर्णव गोस्वामी आणि त्यांच्या पत्रकारांना आरोपी का केले नाही ? असा सवालही न्यायालयाने पोलिसांना केला. मुंबई पोलीस जाणुनबुजून गोस्वामी व अन्य कर्मचाऱ्यांना आरोपी करत नाहीत. कारण त्यांना गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात येण्यास मिळू नये, असे एआरजीतर्फे ज्येष्ठ वकील अशोक मुंदर्गी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे.