TRP घोटाळा : ‘रिपब्लिक’च्या आणखी 3 अधिकार्‍यांची होणार चौकशी

मुंबई : राज्यात सध्या गाजत असलेल्या टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक टीव्ही चॅनेलचे तीन अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी, कार्यकारी अधिकारी हर्ष भंडारी व प्रिया मुखर्जी यांना शनिवारी समन्स बजावले होते. या तिघांना रविवारी सकाळी गुन्हे शाखेत बोलावले असून त्यांची चौकशी केली जाणार आहे. बनावट टीआरपी रेटिंगद्वारे कोट्यवधींच्या जाहिराती मिळवून नागरिकांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

या घोटाळ्यात बनावट टीआरपीद्वारे मिळालेल्या रँकिंगच्या आधारावर जाहिराती मिळविण्यासाठी वृत्तवाहिन्यांना मदत करत असलेले रॅकेट मुंबई पोलिसांनी उघड केले होते. या घोटाळ्यात रिपब्लिकसह अन्य दोन टीव्ही चॅनेलवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलच्या (बीएआरसी) तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी हे रॅकेट उघडकीस आणले आहे.

याप्रकरणी चॅनेलच्या आर्थिक व्यवहाराबाबत माहिती घेण्यासाठी पोलिसांनी मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) शिव सुंदरम यांना शुक्रवारी समन्स जारी केले होते. शिव सुंदरम यांनी शनिवारी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत असमर्थता दर्शवणारे पत्र पाठवले होते. यानंतर अधिकार्‍यांनी इतरांकडे विचारणा करण्याचे ठरवल्याचे समजते. याप्रकरणी मॅडिसन वर्ल्डचे संस्थापक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सॅम बलसारा यांच्याकडून पोलिसांनी माहिती घेतली.

शिव सुंदरम यांनी हजर होण्यासाठी असमर्थता दर्शवणार्‍या पत्रात मुदतवाढ मागताना म्हटले आहे की, चौकशीला सहकार्य करण्यास तयार आहोत, मात्र याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे, ती होईपर्यंत आमच्या कोणाकडे चौकशी करू नये, मी वैयक्तिक कारणाने मुंबईबाहेर आहे. केवळ 14 व 15 ऑक्टोबरला येणार आहे. शिव सुंदरम यांच्या या पत्रानंतर अधिकार्‍यांनी रिपब्लिक चॅनलच्या अन्य तीन अधिकार्‍यांकडे चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.