रिपब्लिक TV मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात करणार 200 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक टीव्ही विरोधातील एफआयआर रद्द करण्याबाबतच्या याचिकेवर सोमवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी टीआरपी घोटाळ्यातील एफआयआरमध्ये रिपब्लिक टीव्हीचं नाव नसल्याचं म्हटलं. त्यानंतर रिपब्लिक टीव्हीच्यावतीने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात 200 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. याबाबत रिपब्लिक मीडिया नेटवर्कच्यावतीने पत्रक काढून माहिती दिली आहे.

रिपब्लिकच्या पत्रानुसार, नेटवर्कच्यावतीने त्यांची लीगल टीमला मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात 200 कोटी रुपयांचा दावा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये रिपब्लिकच्य संपादकांच्या अब्रू नुकसानी विरोधात 100 कोटी आणि रिपब्लिक मीडिया नेटवर्कच्या नुकसानीला कारणीभूत ठरल्या प्रकरणी 100 कोटी रुपयांचा समावेश आहे.

स्वत:च्या आयुक्तांविरोधात मुंबई पोलिसांनी आणि महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी आज हायकोर्टात टीआरपी प्रकरणातील एफआयआरमध्ये रिपब्लिक टीव्हीचे नाव नसल्याचे सांगितले. याद्वारे त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला, असे रिपब्लिकच्या पत्रकात म्हटले आहे.

अधिकाधिक जाहिराती पदरी पाडून घेण्यासाठी कृत्रिमरीत्या टीआरपी वाढवणाऱ्या वहिन्यांचे बिंग फोडल्याचा दावा या महिन्याच्या सुरुवातीला मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. हा आर्थिक घोटाळा असून त्यात रिपब्लिक या वृत्तवाहिनीसह फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आदी वाहिन्यांचा सहभाग पुढे आल्याचेही त्यांनी म्हटले होते