नाशिक-पुणे महामार्गावर ट्रक-दुचाकीच्या अपघातात बाप-लेकीचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिक-पुणे महामार्गावर ट्रक आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात बाप-लेक जागीच ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला गावच्या हद्दीत ही घटना घडली.

अशोक सोमनाथ वाघ, शकुंतला अशोक वाघ ही मयतांची नावे आहेत. आशाबाई वाघ, दिलीप भाऊसाहेब मेंगाळ ही गंभीर जखमींची नावे आहेत. हे सर्व अकोले तालुक्यातील कळस गावचे रहिवासी आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी (दि. 10) संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथे यात्रेनिमित्त ते नातेवाईकांकडे गेले होते. यात्रेवरून पुन्हा कळस येथे जात असताना नाशिकहून पुण्याकडे सिमेंटचे ठोकळे घेवून जाणार ट्रक आणि हे चौघे प्रवास करीत असलेल्या दुचाकीचा अपघात झाला. यात दुचाकीवरील अशोक वाघ व शकुंतला वाघ हे दोघे जागीच ठार झाले. तर आशाबाई वाघ व दिलीप मेंगाळ हे दोघे गंभीर जखमी झाले आहे.

जखमींवर संगमनेर शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.