आंबेनळी घाटात ट्रक दरीत कोसळला

पोलादपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पोलादपूर महाबळेश्वर रोडवरील आंबेनळी घाटात फरशा घेऊन जाणाऱ्या ट्रकला मोठा अपघात झाला आहे. घाटातून ट्रक खोल दरीत कोसळला असून या अपघाताची माहिती सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मिळाली.

रायगड पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलादपूर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले आहेत. मात्र फरशा घेऊन जाणारा हा ट्रक खोल दरीत कोसळला असल्याने तेथे पोहचणे अवघड आहे. स्थानिकांची मदत घेऊन पोलीस ट्रकजवळ पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत.

या ट्रकमध्ये चालक व सहप्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. २८ जुलै रोजी दापोली कृषी विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी सहलीला महाबळेश्वरला जात असताना त्यांच्या बसला याच घाटात अपघात झाला होता. त्यात ३० जणांचा मृत्यु झाला होता. यावेळी बसमधील एकमेव प्रकाश सावंत हे वाचले होते. त्यांनी गाडीतून उडी टाकल्याने ते वाचले होते. दरम्यान, याप्रकरणाच्या तपासात ते स्वत: बस चालवत होते, असे निष्पन्न झाले होते. याच घाटात बुधवारी ट्रकचा अपघात झाला आहे.