कोल्हापूर : टायर फुटून झालेल्या अपघातात 2 ठार

गारगोटी : पोलीसनामा ऑनलाइन – गारगोटी-उत्तूर येथील पांगीरे खडकमाळ वस्तीजवळ ट्रकचा टायर फुटून भीषण अपघात झाला. रविवारी दुपारच्या सुमारास झालेल्या या अपघातात दोघे दुचाकीस्वार ठार झाले. युवराज महिपती परीट (वय ४२, रा.ठिकपुर्ली) आणि नंदकुमार पांडुरंग गायकवाड (वय ४२, रा.माजलगाव, ता.राधानगरी) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गारगोटी-उत्तूर रोडवर पिंपळगावकडून गारगोटीकडे जाणाऱ्या (एमएच 09 एमएल 2003) या ट्रकचा उजव्या बाजूकडील टायर फुटला. त्याचवेळी पिंपळगावकडे डाव्या बाजूने चाललेल्या (एम एच 09 ईएच 4042) दुचाकीस्वारांना ट्रकने जोरात धडक दिली आणि फरफटत नेऊन खडकमाळ वस्तीजवळच्या शेतात उलटता. या भीषण अपघातात युवराज परीट हा ट्रकच्या पुढील चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला. तर नंदकुमार गायकवाड याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी नेताना त्याचा मृत्यू झाला.

हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रक रस्त्यापासून सुमारे ५० फूट अंतरावरील शेतात जाऊन उलटला आणि त्याची पुढील दोन्ही चाके तुटून पडली होती. दुचाकी व दुचाकीस्वारांच्या हेल्मेटचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. अपघाताची नोंद भुदरगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे करीत आहेत.