चोरट्याने पोलीस ठाण्यातून चोरून नेला ट्रक

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिसांनी जप्त केलेला ट्रक चक्क पोलीस ठाण्यातूनच चोरीस गेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नागपूरमधील लकडगंज पोलीस ठाण्यात ही घटना घडली असून यामुळे चोरट्याने उघडपणे पोलिसांना आव्हानच दिलं आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

याबाबतची माहिती अशी की, एके स्टील कंपनीचा सळ्यांनी भरलेला ट्रक ९ ऑक्टोबर रोजी चोरी झाला होता. यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट –3 च्या पथकाने संजय ढोने नावाच्या आरोपीस ट्रक व मालासह अटक केली होती व लकडगंड पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले होते.

यावर लकडगंज पोलिसांनी पुढील कारवाई करत, चोरट्यास न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर न्यायालयात आरोपीस जामिन मंजूर झाला होता. यानंतर आरोपीने पोलिसाच आव्हान देत लकडगंज पोलीस स्थानकासमोर उभा असलेला ट्रक घेऊन पोबरा केला.