सुसाट ट्रकने अनेकांना उडवले ; १ ठार, ५ जखमी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव जाणाऱ्या ट्रकने वाटेतील अनेक वाहनांना धडक दिल्याने त्यात एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. शेख मोसीन शेख अमीन (वय २६, रा. न्यू नंदनवन कॉलनी) असे मृताचे नाव आहे.  ही घटना मंगळवारी औरंगाबादमधील चेलीपुरा येथे घडली आहे. त्यानंतर लोकांना धडक देत बेदरकारपणे निघुन जाणाऱ्या ट्रकचालकाचा नागरिकांनी पाठलाग करत त्याला चांगलाच चोप दिला आहे.

काश्मीरमध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरुच ; 4 जवान शहीद, 9 जखमी

चेलीपुरा ते शहागंज यादरम्यान एका ट्रकचालकाने भरधाव वेगाने ट्रक चालवत अनेकांना उडवले. पाच रिक्षांसह नऊहून अधिक दुचाकींना धडक देत गल्लीबोळांत घुसलेल्या ट्रकने फाजलपुरा पुलावर एका दुचाकीस्वाराला (एमएच 20 डीक्‍यू 2297) चिरडले. त्यात त्याचा मृत्यू झाला. यामध्ये ५ जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. ट्रकच्या धडकेत जखमी झालेले शेख इनामोद्दीन शेख करिमोद्दीन (वय 28, रा. कोहिनूर कॉलनी), शेख रईझुद्दीन शेख अफिझुद्दीन (वय 25, रा. आरिफ कॉलनी), किशोर शेट्टी (वय 52, रा. राजाबाजार), शेख अब्दुल सईद वाहेद (वय 35, रा. रहेमानिया कॉलनी), शेख जहीर शेख सबर (वय 35, रा. काचीवाडा) यांच्यावर घाटीत उपचार सुरू असल्याचे निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

या सगळ्या प्रकारानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी शहागंज इथे ट्रक अडवला. त्यानंतर जमावाने चालकाला बेदम मारहाण केली. यामध्ये ट्रक चालकही गंभीर जखमी झाला आहे. याची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले असून त्यांनी ट्रकचालकाला जमावापासून सोडविले असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठविले आहे.