कौतुकास्पद ! ‘मधुचंद्र’ पाहण्यासाठी न जाता पत्नीला अभ्यास करायला लावला; अर्धागिणी पोलिस उपनिरीक्षक (PSI) बनताच केला ‘सलाम’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –  सातारा येथील जयदीप पिसाळ यांची एक जीवन गोष्टच म्हणावी लागेल तर त्यांनी आपल्या मिळालेल्या नोकरीला नाकारून आपल्या पत्नीला शिकवलं आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) बनवलं आहे. तर महत्वाच म्हणजे नवऱ्याने (जयदीप पिसाळ) आपल्या बायकोला हनिमूनला न नेता तिला एक चांगला पंजाबी ड्रेस घेऊन दिला आणि पुस्तके दिली आणि एक वेगळी रूम देऊन पीएसआयच्या अभ्यासाला लागण्यास सांगितले. अन ती गोष्ट सत्यात उतरली.

जयदीप पिसाळ हे लहानपणीपासूनच कष्टाळू होते. त्यांनी पुढं चांगलं शिक्षण घेतलं. जयदीप यांनी अनेक वेळा, वाठार स्टेशनला उसाचा रस देखील विकायचे वाठारला ३ मिनिटे रेल्वे थांबायची याच ३ मिनिटात ते १०-१२ ग्लास रस विकून काही रुपये जमा करायचे व तेच पैसे पुढे शिक्षणासाठी वापरायचे. त्यांनी खूप मेहनत घेऊन MPSC ची तयारी केली आणि एकदा नाही, तर २ वेळा त्यांनी या परीक्षेत यश मिळवले. एकदा PSI आणि एकदा दुसरी पोस्ट त्यांना मिळाली होती. मात्र, त्यांच्या मनात वेगळंच होतं. त्यांना काहीतरी करायचं होतं, म्हणून त्यांनी यासाठी अहोरात्र मेहनतही घेतली. मात्र, जयदीपना खऱ्या अर्थाने गावाची सेवा करायची होती. गाव बदलायचं होतं, गावचा विकास साधायचा होता. त्यामुळे त्यांनी कोणतीही नोकरी जॉईन केली नाही. गावाची ओढ असल्याने त्यांनी आपल्या सेवेला प्रारंभ केला. तद्नंतर MPSC पास करून पोस्ट नाकारलेल्या जयदीपणे गावात हिरो होंडाची फ्रॅन्चायजी घेतली. पुढे ते पळशी गावचे सरपंच झाले.

गावचे सरपंच झाल्याने त्यांना हवातसा गावचा विकास साधणं शक्य होतं, त्यामुळे त्यांनी गावामध्ये विविध योजना आणल्या व गोरगरीबांसाठी ते प्रामाणिक कार्य करत राहिले. त्यांनी अल्पावधीतच गावचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात केली. गावात अनेक कामं केल्याने त्यांच्या कर्तृत्वाचे अनेकांनी कौतुक देखील केले. नंतर कालांतराने कल्याणी सकुंडेवर या मुलीवर त्यांचे प्रेम झाले. नंतर कल्याणीच्या घरच्यांनी मात्र मुलगी देण्यास नकार दिला होता. कल्याणीच्या वडिलांनी देखील नोकरी न स्वीकारल्याने त्याच्यावर टीका केली व आपली मुलगी जयदीपला देण्यास नकार दिला होता. यातूनही जयदीप पिसाळ हे दुःखी न होता कल्याणीच्या बाबांना म्हटले, की दोन वर्षात तुमच्या मुलीला PSI करून दाखवतो, असा ठाम आत्मविश्वास देऊन जयदीपने कल्याणीच्या वडिलांचे मन जिंकले.

आणि त्यांचा विवाह झाला. लग्नसोहळा पार पडल्यानंतर जयदीपच्या या अनोख्या हनिमूनचे कल्याणीच्या बाबांनी देखील भरपूर कौतुक केले आणि जयदीपच्या पाठीवरती शाब्बासकीची थाप दिली आहे.

गावाचा विकास बघत जयदीपणे कल्याणीला अभ्यासात मार्गदर्शन केले. गप्पा न मारता जनरल नॉलेज शिकवत तिच्याकडून अभ्यास परिपूर्ण करुन घेतला व तो क्षण आता जवळ आला होता. जयदीपणे कल्याणीच्या वडिलांना दिलेला ‘तो’ शब्द आता सत्यात उतरणार होता आणि झालंही तसंच कल्याणी २ वर्षात MPSC पास झाली आणि तिची ट्रेनिंगही सुरु झाली आहे. आणि कल्याणी ही मुंबई पोलिसमध्ये पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून सध्या कार्यरत आहे. या अनोख्या प्रकारावरून जयदीप पिसाळ याचे सर्वोतोपरी कौतुक होत आहे.