डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘या’ निर्णयामुळं भारतीयांना मोठा दिलासा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानेएच-1 बी व्हिसाधारकांना दिलासा दिला आहे. एच-1 बी व्हिसावरील निर्बंध थोडे शिथिल केले आहेत. याआधी ट्रम्प प्रशासनाने त्यांना अमेरिकेत प्रवेशबंदीचा निर्णय लागू केला होता. दरम्यान या निणर्यामुळे भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लॉकडाउन आधी जे काम करत होते, त्याच नोकरीसाठी एच-1 बी व्हिसाधारकांना अमेरिकेत परतायचे असेल तर, त्यांना परवानगी देण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. व्हिसावरील निर्बंध शिथिल करताना एच-1 बी व्हिसाधारकाच्या पत्नीलाही अमेरिकेत परतण्याची परवानगी दिली आहे. एच-1 बी व्हिसावरील निर्बंध शिथिल करण्याचा भारतीयांना सर्वाधिक फायदा होईल.

डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी नागरिकांना अमेरिकेत रोजगाराची संधी देणार्‍या एच-1 बी सह वेगवेगळया व्हिसांवर बंदी आणली होती. या व्हिसामुळे अमेरिकन नागरिकांच्या नोकर्‍या संकटात येतात असा ट्रम्प यांचा दावा आहे. कोरोनामुळे अमेरिकेत लॉकडाउन होता. त्यामुळे तिथे मोठया प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली आहे. अशा काळात तिथल्या लोकांच्या नोकर्‍या वाचवण्यासाठी ट्रम्प यांनी वेगवेगळया व्हिसावर बंदी आणली होती. पण आता त्यांनी एच-1 बी व्हिसाधारकांना दिलासा दिला आहे.