तब्बल 28 वर्षानंतर अमेरिका करत आहे अण्विक चाचणीचा विचार !

पोलिसनामा ऑनलाईन – अमेरिकेतील ट्रम्प प्रशासन तब्बल 28 वर्षांनंतर पुन्हा एकदा अण्विक चाचणी करण्याच्या विचारात आहे. चीन आणि रशियापासून धोका असल्यामुळे हा विचार अमेरिका करीत असल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेने अखेरची अण्विक चाचणी 1992 मध्ये केली होती. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील संरक्षण संस्थांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पार पडलेल्या बैठकीत याबाबत चर्चा केली.

रशिया आणि चीन हे दोन्ही देश त्यांच्या देशात अण्विक चाचण्या करत असतात. परंतु आतापर्यंत त्या देशांनी ही बाब नाकारली आहे, असे संरक्षण क्षेत्राशी निगडीत एका अधिकार्‍याने सांगितले आहे. दरम्यान, 15 मे रोजी वरिष्ठ अधिकार्‍यांची एक बैठक पार पडली. त्यावेळी अमेरिकेच्या अण्वस्त्रांची ‘वेगवान चाचणी’ केल्यास अमेरिकेला रशिया आणि चीन या दोन्ही देशांशी वाटाघाटी करण्यास मदत होईल, असा प्रस्तावही देण्यात आला आहे. अमेरिकेच्या या अण्विक चाचणीचा मुख्य उद्देश म्हणजे त्याच्या अणुबॉम्बच्या सद्या असलेल्या साठ्याची विश्वासार्हता तपासून नवीन प्रकारच्या आण्विक शस्त्रास्त्रांची निर्मिती करण्याचा आहे. सध्या कोणतीही नवी अण्विक शस्त्रास्त्र तयार करण्यात येणार नाही, असेही ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परंतु चर्चेसाठी रशिया आणि चीनने नकार दिला तर शस्त्रास्त्र तयार करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवला असल्याचे त्यांनी नमूद केले.