आरोग्य तज्ज्ञांच्या इशारानंतर देखील ट्रम्प यांचा खुलासा, म्हणाले – ‘रोज घेतोय मलेरियाचं औषध’

वॉशिंग्टन : वृत्त संस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कोरोना संसर्गाची टेस्ट आणि उपचाराच्या बाबतीत दिलेल्या वादग्रस्त सल्ल्यामुळे चर्चेत आहेत. सोमवारी ट्रम्प यांनी पुन्हा खुलासा केला की, हेल्थ एक्सपर्टसच्या इशार्‍यानंतरही कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी ते रोज हायड्रॉक्सीक्लोरोक्विन घेत आहेत. विशेष म्हणजे हे औषध तज्ज्ञांनी यापूर्वीच नाकारले आहे. या औषधामुळे हृदयाचे आजार होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तरी सुद्धा ट्रम्प सतत या औषधाची वकिली करत आहेत.

देशातील मोठे रेस्टॉरन्ट एक्झिक्यूटिव्हशी बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, व्हाईट हाऊसच्या डॉक्टरांनी सल्ला दिल्यानंतर ते रोज मलेरियाचे औषध खात आहेत. त्यांनी म्हटले की, त्यांच्या डॉक्टरांनी हे औषध खाण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, अनेक आठवड्यांपासून मी हे औषध खात आहे आणि नियमित खात आहे.

ट्रम्प यांच्या या सल्ल्याने हेल्थ एक्सपर्टस समाधानी नसल्याचे दिसत आहे. त्यांच्यानुसार या औषधाचे साईड इफेक्ट्स होण्याचा धोका आहे आणि त्याचा जास्त डोस घेतल्याने हृदयाच्या आजारांचा धोका वाढू शकतो. हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा वापर मलेरियाचा ताप कमी करण्यासाठी केला जातो. परंतु, कोरोनाच्या रूग्णांवर याचा वापर वादग्रस्त ठरला आहे.

मलेरियाच्या औषधापासून धोका!

जाणकारांनुसार मलेरियाच्या उपचारासाठी वापरण्यात येणारे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि क्लोरोक्वीन दोन्हींची रासायनिक संरचना आणि मेडिकल वापर वेगवेगळा आहे. परंतु, कोविड-19 आजारावर हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या उपयुक्ततेबाबत विविध दावे केले जात आहेत. याबाबत काही संशोधन सुद्धा करण्यात आले आहे.

पॅन अमरीकन हेल्थ ऑर्गनायजेशनने 6 एप्रिलला इशारा दिला होता की, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन बाबत करण्यात येत असलेल्या दाव्यांबाबत अद्यापपर्यंत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही.

जोपर्यंत कोणताही ठोस पुरावा सापडत नाही तो पर्यंत या औषधाचा वापर न करण्याचे आवाहन पाहोने अमेरिकन सरकारला केले आहे. संस्थेने म्हटले आहे की, सध्याच्या निर्देशांनुसार आणि प्रक्रियांचे पालन केल्याशिवाय क्लोरोक्वीन किंवा हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर धोकादायक ठरू शकतो. यामुळे व्यक्ती गंभीररित्या आजारी पडू शकते, तसेच मृत्यूदेखील ओढावू शकतो.

यूएस नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिननुसार जे रूग्ण हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा वापर दुसर्‍या आजारासाठी करतात, त्यांच्यात डोकेदुखी, चक्कर, भूक न लागणे, पोट खराब होणे, डायरिया, पोटादुखी, उलटी, त्वचा लालसर होणे, असे साईड इफेक्ट दिसून येतात. सेंटर फ़ॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) चे म्हणणे आहे की, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन एक असे औषध आहे जे मलेरियाच्या रूग्णांसाठी उपयुक्त आहे.