अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढला

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिका आणि इराण यांच्यामधील तणाव अधिकच वाढू लागला आहे. इराणच्या अणुकार्यक्रमाबद्दल दोन्ही देशांमध्ये कायमस्वरुपी ताण आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ने म्हटले आहे की ते इराणवर सैन्य कार्यवाही करू इच्छित नाहीत परंतु तशी शक्यत बनली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. अमेरिकेने इराणमधून पेट्रोल आयात करणाऱ्या देशांवर प्रतिबंध घातले आहेत. याशिवाय अमेरिकेने इराणच्या खाडीजवळ आपली युद्धनौका पाठवली आहे.

काय आहे अमेरिका आणि इराण वाद
इराणचा अणुकार्यक्रम थांबविण्यासाठी २०१२ पासून सातत्याने दबाव वाढविण्यात येत आहे. त्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्या सरकारने २०१५ मध्ये करार करण्यासाठी पुढाकार घेतला होता. अमेरिकेबरोबरच रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन या सुरक्षा परिषदेतील कायम सदस्यांबरोबरच जर्मनी या देशांनी इराणबरोबर हा करार केला आहे.

मात्र अध्यक्षीय निवडणुकीतील प्रचारापासून डोनाल्ड ट्रम्प यांचा या कराराला विरोध होता. या करारातून इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला आळा बसलेला नाही, असा त्यांचा कायमचा आरोप आहे. त्यांनी अध्यक्ष झाल्यानंतरही, हा करार इराणच्या बाजूने एकतर्फी असल्याचा आरोप केला होता. इराणकडून अणुकराराचे पालन होत असल्याचे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने स्पष्ट केल्यानंतरही ट्रम्प यांच्या भूमिकेमध्ये बदल झाला नाही. अखेरीस, मे २०१८ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेच्या नव्या सरकारने हा करार रद्द केला. त्यानंतर इराणवर पुन्हा एकदा अमेरिकेकडून बंदी घालण्यात आली आहे. ट्रम्प यांनी या करारातून माघार घेत, इराणवर निर्बंध लादले.