अमेरिका : दंगल रोखण्यासाठी मल्ट्रीला पाचारण करणार, आतापर्यंत 4000 जणांना अटक

वॉशिंग्टन : पोलीसनामा ऑनलाइन –  जॉर्ज प्लॉईड यांच्या मृत्यूनंतर कृष्णवर्णीय समुदायाची निदर्शने अधिक तीव्र होताना दिसत आहे. यामुळे अमेरिकेतील तब्बल १४० शहरे हिंसेच्या आगीत होरपळत आहे. याची झळ रविवारी व्हाइट हाऊसपर्यंत पोहचली होती. त्यामुळे राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या ‘सिक्रेट सर्व्हिस’ला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलेनिया व १४ वर्षांचा मुलगा बरॉन यांना सुमारे एक तासभर व्हाईट हाऊसच्या खाली तळघरात असलेल्या बंकरमध्ये हलवावे लागले होते. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उसळलेल्या हिंसक आंदोलनावर नियंत्रण मिळवण्याकरिता देशात लष्कराला पाचारण करण्यात येणार असल्याचं सांगितलं.

ट्रम्प म्हणाले, “आपली राजधानी असलेल्या वॉशिंग्टन डीसीच्या संरक्षणासाठी वेगवान आणि निर्णायक कारवाई करणार आहे. दंगल आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्याकरिता लष्कराचे हजारो सैनिक, कर्मचारी आणि अंमलबजावणी अधिकारी पाठवत आहे. तसेच, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकेत यापूर्वीच राष्ट्रीय गार्ड तैनात करण्यात आले आहेत.”

त्याचबरोबर, ट्रम्प यांनी जॉर्ज प्लॉईड आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणार असल्याचं सांगितलं. पुढं त्यांनी म्हटलं, जॉर्जच्या दुर्दैवी हत्येमुळे सर्व अमेरिकन दुःखी झाले आहेत. माझे पहिले आणि मुख्य कर्तव्य म्हणजे देशातील लोकांना सुरक्षा देण्याचे आहे. मी शांततापूर्व निदर्शनास संतप्त जमावात बदलू देऊ शकत नाही. या दंगलीमुळे निष्पाप लोकांचा सार्वधिक बळी गेला आहे. ”

आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्याकरिता वॉशिंग्टन डीसी येथे लष्कराची एक बटालियन तैनात करण्यात आली आहे. जवळपास २५० जवान परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. हिंसक आंदोलनादरम्यान सुमारे चार हजार लोकांना अटक करण्यात आली आहे.

बंकरमधील आसऱ्याची ५० वर्षातील पहिली वेळ

दहशतवादी हल्ल्यासह अन्य काही आणीबाणीची परिस्थिती आली तर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी या अभेद्य बंकरची सोय केलेली आहे. मात्र, गेल्या ५० वर्षाहुन अधिक काळात राष्ट्राध्यक्षांना या बंकरचा आसरा घेण्याची वेळ प्रथमच आली. एवढच नाही तर वॉशिंग्टन डीसी या राजधानी क्षेत्रात सुरक्षा दलांनी लागू केलेली सतर्कता ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या तोडीची होती. कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे नेते मार्टिन ल्युथर किंग (ज्यू) यांच्या हत्येनंतर सन १९६७ साली उसळलेल्या सामाजिक असंतोषानंतर आताचा सुरु असलेला अमेरिकेतील उद्रेक तीव्र व व्यापक असल्याचे मानलं जात आहे.