‘4 दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर इंदुरीकर महाराजांना काळं फासणार’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – हभप इंदोरीकर महाराज यांच्या गर्भलिंग निदान वक्तव्यामुळे ते अडचणीत आले आहेत. त्यांच्या विरोधात भूमाता ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या चार दिवसांत इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर त्यांना महिला कार्यकर्त्या काळं फासतील असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

तृप्ती देसाई यांनी सांगितले की, येत्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना इंदोरीकर महाराजंबद्दल जाब विचारला जाईल. इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करावा या संदर्भात भूमाता ब्रिगेडकडून आज दुपारी प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.

दरम्यान, इंदोरीकर महाराजांनी माफी मागणारे पत्रक प्रसिद्ध केले आहे. मी जे काही बोललो आहे, ते माझ्या अभ्यासानुसार बोलले आहे. माध्यमांनी त्याचा विपर्यास केला आहे. तरीही वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असे सांगत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

इंदोरीकर महाराजांचा 5 फेब्रुवारीच्या कीर्तनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. तर त्यांच्या समर्थक आणि विरोधकांमध्ये शाब्दीक युद्ध पेटले. याच विषयावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही कारवाईची मागणी केली आहे. याच विषयावर तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर यांच्या विरोधात भूमिका घेतली असून त्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोलही होत आहेत.