‘त्या’ नेत्यांचा शोध घेण्यासाठी भूमाता ब्रिगेडकडून 500 रूपयांचे बक्षिस जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान मुंडे यांच्यावर बलात्कारासारखे आरोप झालेले असताना राज्यातील महिला नेत्या गेल्या कुठे असा सवाल भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी विचारला आहे. शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे असो वा काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर असतील, या नेत्या सध्या महाराष्ट्रात नाहीत का? त्या सगळ्या हरवल्या आहेत का? आणि खरोखरच त्या बोलत नसतील तर त्यांचा शोध घ्यावा लागेल, या नेत्यांचा शोध घेणाऱ्यास भूमाता ब्रिगेडकडून 500 रुपये बक्षिस देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

याबाबत तृप्ती देसाई म्हणाल्या की, मुंडे यांच्यावर रेणु शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. मात्र या विषयावर महाराष्ट्रातल्या महिला नेत्या जाहीर बोलायला तयार नाही, ज्या महिला नेत्या एखाद्या पीडितेवर अत्याचार झाला, तक्रार आली तर तातडीने पत्र व्यवहार करतात, ट्विट करतात, पीडितेची भेट घेतात, मग आता मुंडे प्रकरणी या महिला शांत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाच्या नेत्याविरोधात कोणती महिला तक्रार करत असतील, तर या नेत्या शांत बसणार असतील, तर आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा कार्टा अशी स्थिती आहे, असा न्याय महिला नेत्या देत असतील तर महिला सबलीकरण यापुढे महाराष्ट्रात अशक्य आहे, शक्ती कायदा आपण करता मग हा कायदा सर्वांसाठी समान आहे, मग गरीब, श्रीमंत, नेता, सर्व सामान्य असा फरक का होतोय? याचे उत्तर या महिला नेत्यांनी द्यावे, रेणु शर्मा यांच्यासोबत आम्ही आहोत, पण रेणु शर्मा यांच्यावरही आरोप केले आहेत त्या चुकीच्या असल्या तर त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणीही देसाई यांनी केली आहे. दरम्यान मुंडेच्या राजीनाम्यासाठी भाजपाच्या महिला आघाडीने ठिकठिकाणी आंदोलन केले आहे.