MMS बनविल्याच्या संशयावरुन विश्वस्ताची दहावीच्या विद्यार्थ्याला मारहाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एमएमएस बनविल्याच्या संशयावरुन शाळेच्या विश्वस्ताने दहावीच्या विद्यार्थ्याला जबर मारहाण करीत अश्लिल वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार मुलुंडमधील एका नामांकित शाळेत घडला आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी विश्वस्ताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जेरी जोसेफ (वय ४३) असे या गुन्हा दाखल झालेल्या विश्वस्ताचे नाव आहे.

याप्रकरणी विद्यार्थ्याच्या आईने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, काही दिवसांपूर्वी शाळेच्या शिक्षकांचे फोटो मॉर्फ करत सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आले होते. त्या पाठोपाठ विश्वस्ताचा फोटोही विद्यार्थ्याकडून व्हायरल करण्यात आला. यामागे या विद्यार्थ्याचा हात असल्याचा संशय विश्वस्ताला होता.

१५ वर्षाचा हा मुलगा सोमवारी नेहमीप्रमाणे सकाळी सव्वादहा वाजता शाळेत गेला. साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तो अन्य विद्यार्थ्यांबरोबर प्रयोगशाळेत गेला. तेथून बाहेर पडल्यावर पाणी पिण्यासाठी तळ मजल्यावर आला. तेव्हा विश्वस्त जोसेफ यांनी त्याला पाठीमागून लाथ मारत खाली पाडले. तेथून त्याला मारहाण करीत त्यांच्या कार्यालयात नेले. तेथेही त्याला मारहाण करत त्याच्या गुप्तांगावर मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यावेळी जोसेफबरोबर अन्य शिक्षक उपस्थित होते.

विद्यार्थ्याने अनेकदा आपला त्यात हात नसल्याचे सांगितल्यानंतरही विश्वस्ताने त्याला मारहाण सुरुच ठेवली होती. काही कामानिमित्त विश्वस्त बाहेर जाताच या विद्यार्थ्याने त्यांच्या केबिनमधून पळ काढला व घर गाठले. आपल्या आईला ही माहिती सांगितल्यावर त्यांनी मुलाला दवाखान्यात नेऊन उपचार केले व त्यानंतर पोलिसांकडे धाव घेतली. रात्री उशिरा मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.