SSR Death Case : सुशांतच्या प्रकरणात अनेक गोष्टी दाबल्या जाताहेत, लवकरच सत्य बाहेर येणार : खा. गिरीश बापट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राजकीय जीवनात प्रत्येकाला आपलं वैयक्तिक मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. पार्थ पवार तर पवार कुटुंबातील असून, ते लोकसभेचे उमेदवार देखील होते. त्यावेळी पार्थ पवार यांची किंमत कळली नव्हती का ? की त्यांना अशीच उमेदवारी जाहीर करण्यात आली होती, असा प्रश्न उपस्थित करत पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी शरद पवार यांना जोरदार टोला लगावला आहे. तसेच सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अनेक सत्य दडपली जात आहेत. ती सर्व सत्य लवकरच बाहेर येतील असेही बापट यांनी म्हटले आहे.

पार्थ पवार यांनी सीबीआयची चौकशी करण्याची मागणी केली होती. यावर भाष्य करताना गिरीश बापट म्हणाले, पार्थ पवार यांना देखील सुशांत प्रकरणात काहीतरी मोठे सत्य दडपले जात असल्याचे वाटलं असेल, त्यामुळेच ते सत्य आपण बाहेर काढावे म्हणून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ‘सत्यमेव जयते’ असे ट्विट केले असेल, अशा शब्दात बापट यांनी पार्थ पवारांच्या ट्विटला रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे.

पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात येणाऱ्या जम्बो हॉस्पिटलच्या कामाची पाहणी खासदार गिरिश बापट यांनी केली. जम्बो हॉस्पिटलचे काम संथ गतीने सुरु असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी याबाबत पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांना निवेदन देत काम वेळेत न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

थोड्याच दिवसात सत्य बाहेर
बापट म्हणाले, राजकीय जीवनात मी कोणावरही टीका करत नाही. आपण राजकारण इतक्या खालच्या पातळीवर नेऊ नये. जेणेकरुन त्यातून काही प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे त्याला किंमत किती हे सर्वांना अगोदरपासून माहिती आहे. कोणाच्या मागे कोण उभा आहे, हे थोड्या दिवसांत कळेल, ते ही बाहेर येईल. तसेच सुशांत प्रकरणात अनेक सत्य दडपली जात आहेत. ती सर्व बाहेर येतील असेही बापट यांनी म्हटले.

निर्णय घेण्यात भाजपची मंडळी हुशार
पार्थ पवार यांच्या भाजप प्रवेशाबाबत बापट म्हणाले, भाजपची विचारसरणी वेगळी आहे. ती विचारसरणी पार्थ पवार यांना पटते का हे त्यांनाच विचारले पाहिजे. मात्र, योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यात भाजपची मंडळी हुशार आहेत, आणि योग्य तो निर्णय घेतील असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.