डोक्यात तलवारीने वार करून खुनाचा प्रयत्न

छेडछाडीच्या भांडणातील रागातून केला हल्ला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – छेडछाडीवरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून नऊ जणांच्या टोळक्याने दोघांवर तलवार व इतर शस्त्रांनी वार करून खुनाचा प्रयत्न केला. पाथर्डी तालुक्यातील कारेगाव शिवारातील जनावरांच्या छावणीत हा प्रकार घडला.
याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात विष्णू गेणा भाबड, भगवान गेणा भाबड, देविदास लक्ष्‍मण भाबड, प्रशांत भगवान भाबड, ऋषिकेश पोपट दहिफळे, गणेश मारुती दहिफळे, गेणा तुकाराम भाबड, जिजाबाई गेणा भाबड, सुनिता भगवान भाबड (सर्व रा. कारेगाव, ता. पाथर्डी) यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, जखमी व्यक्तीच्या भाचीची छेडछाड केल्याप्रकरणी त्यांचे भाबड कुटुंबीयांसोबत भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून कारेगाव येथील चारा छावणीत नऊ जणांच्या टोळक्याने तलवार, कोयता, कुऱ्हाड, काठी आदी शास्त्रांनी हल्ला केला. डोक्यात तलवारीने सपासप वार केले.

या हल्ल्यात दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवार, 4 मे रोजी ही घटना घडली होती. याप्रकरणी जखमी व्यक्तीच्या जबाबावरून पाथर्डी पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम. ए. कचरे हे करीत आहेत.