पुण्याला जगातील सर्वोत्तम शहर बनवण्यासाठी प्रयत्न : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. शहराचे चित्र पालटण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने अनेक प्रकल्प आणले आहेत. पुण्याला जगातील एक सर्वोत्तम शहर बनवण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

येथील कात्रज-कोंढवा रस्त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आमदार भीमराव तापकीर, आमदार योगेश टिळेकर, आमदार जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कात्रज-कोंढवा रस्त्याचे नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आले आहे. हा रस्ता बनवल्यानंतर तो शहरातील सर्वांगसुंदर रस्ता म्हणून ओळखला जाईल. स्थानिक आमदार योगेश टिळेकर यांनी  या रस्त्याकरिता प्रचंड संघर्ष व सातत्याने पाठपुरावा केला. त्यास महानगरपालिकेने सकारात्मक प्रतिसाद देत रस्त्याचे काम करण्यास मान्यता दिली आहे. पुणे शहरात अनेक महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत. स्वारगेट मल्टीमॉडेल हब, आऊटर रिंग रोड, रस्त्यांचे जाळे, नदीसुधार प्रकल्प, कचरा नियोजन व पाणीपुरवठा यामुळे शहराची एक आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण होण्यास मदत होणार आहे.

महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, पुणे शहरातील सर्वात मोठा व भव्य रस्ता म्हणून कात्रज-कोंढवा रस्ता तयार करण्यात येत आहे. यामुळे सातारा, सोलापूर, अहमदनगर तसेच मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. शहरातील सर्व नागरिकांचे समाधान होईल, अशा स्वरुपात रस्ता बनवला जाणार आहे.

आमदार योगेश टिळेकर यांनी रस्त्याच्या कामास मान्यता दिल्याबद्दल राज्य शासन तसेच पुणे महानगरपालिकेचे आभार मानले. ते म्हणाले, पुणे शहरातील सर्वात जास्त जड वाहतूक कात्रज-कोंढवा रस्त्यावर वळवण्यात आली आहे. त्यामुळे

याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. रस्ता पूर्ण झाल्यानंतर शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांची चांगली सोय होईल.
या कार्यक्रमास पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, कात्रज-कोंढवा परिसरातील रहिवासी, शाळकरी मुले मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

रस्त्याचे वैशिष्ट्ये –
कात्रज-कोंढवा 84 मी. डीपी रस्ता राजस सोसायटी ते खडी मशीन चौक ते पिसोळीगाव पुणे मनपा हद्दीपर्यंत विकसित करण्यात येणार आहे. कामाचा कालावधी 36 महिन्यांचा आहे. अंदाजपत्रकीय किंमत 192.44 कोटी अधिक वस्तू व सेवा कर व स्वीकृत निविदा रक्कम 149.52 कोटी अधिक वस्तू व कर इतकी आहे.  रस्त्याची एकूण लांबी 3.43 कि. मी तर रूंदी 84 मीटर आहे. या रस्त्यामुळे सातारा रोड व पुणे-सोलापूरवरील वाहतुकीत सुधारणा होणार आहे. चांदणी चौक,वारजे माळवाडी , वडगाव, कात्रज तसेच साता-य़ाकडून सोलापूर व अहमदनगरकडे जाणा-या वाहतुकीस थेट व जलद पर्याय  उपलब्ध होणार असून त्यामुळे कात्रज ते स्वारगेट व स्वारगेट ते हडपसर या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. वाहतुकीच्या वेळेत व इंधनात बचत होईल. पर्यायाने, प्रदूषणात घट होईल. अपघाताचे प्रमाण कमी होईल.