खुनाचा प्रयत्न करणाऱ्या फरारी संशयिताला अटक

सांगली : पोलीसनामा
अक्षय नाईक याच्यावर शहरातील वडर कॉलनीत खुनी हल्ला झाला होता. या गुन्ह्यातील संशयीत आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. नागेश यमनाप्पा कलकुटगी (२७, रा. वडर कॉलनी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ४ एप्रिल रोजी वडर कॉलनी येथे खुनी हल्ल्याचा प्रकार घडला होता.
खुनी हल्ल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून कलकुटगी पसार झाला होता. बुधवारी दुपारी तो वडर कॉलनी येथील घरी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना मिळाली होती. पिंगळे यांनी त्यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार दुपारी पथकाने सापळा रचून त्यास अटक केली. पोलीस निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील, युवराज पाटील, सतीश आलदर यांच्या पथकाने ही कारवाई केली.