काय सांगता ! होय, मनपा आयुक्त तुकाराम मुंडेंकडून गँगस्टरचा ‘अलिशान’ बंगला ‘उद्धवस्त’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन  – जेथे जातील तेथे आपल्या कामाचा धडाका लावणारे तुकाराम मुंडे यांनी नागपूरकरांना आपल्या कामाची प्रचिती देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून अनधिकृत असलेल्या गँगस्टर आणि गुंड संतोष आंबेकर याचा इतवारी परिसरातील आलिशान बंगला पाडण्यात आला आहे.

संतोष आंबेकर याच्याविरोधात पोलिसांनी १२ ऑक्टोंबरला अटक करुन त्यांच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. त्याची दहशत नष्ट करण्यासाठी त्याची बेड्या घालून वरात करण्यात आली होती. पोलिसांनी त्याचे साम्राज्य उद्धवस्त करणे सुरु होते. ज्या आलिशान बंगल्यातून तो सर्व बेकायदेशीर धंदे करत होता. तो बंगलाही बेकायदेशीर होता. त्याला अटक झाल्यापासून पोलिसांनी या बेकायदेशीर बंगल्यावर कारवाई करण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. मात्र, महापालिकेत याबाबतचा निर्णय अडकला होता.

नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना आंबेकर यांचे प्रकरण सांगून त्याचा अनधिकृत बंगल्यावर कारवाईची मागणी केली होती. तुकाराम मुंढे यांनी गेले अनेक आठवडे अडकलेली ही कारवाई करण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मंगळवारी बंगला पाडण्यास सुरुवात केली. इतवारी परिसरात संतोष आंबेकर याचा प्रशस्त आणि जयपुरी गुलाबी दगडाने कोट्यवधीचा बंगला आहे.

अतिक्रमण विभागाने तीन जेसीबी आणि १ पोकलँडच्या मदतीने या गँगस्टरचा बंगला पाडण्यास सुरुवात केली आहे. यावेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संतोष आंबेकरने अनेक वर्षे गँग चालवून कोट्यवधींची संपत्ती गोळा केली. त्याने याच बंगल्यात अनेक काळे कारनामे केले होते. अनेकांना मारहाण, खंडणीसाठी टॉर्चर, अनेक तरुणींवर बलात्कार असे अनेक घटना आंबेकरने याच बंगल्यातच केल्या होत्या.