नागपुरात तुकाराम मुंढेच्या घराबाहेर समर्थकांची घोषणाबाजी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपुरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यामुळे ते मुंबईसाठी रवाना झाले. त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागपूरकर निवासस्थानी जमले होते. तुकाराम मुंढेंचं समर्थन करणार्‍या नागपूरकरांकडून ‘आगे आगे मुंडे पीछे पड गये गुंडे’ अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी मुंढे समर्थकांना निघून जाण्यास सांगितले असता काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नागपूर महापालिका आयुक्तपदी असणार्‍या तुकाराम मुंढे यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. त्यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर महापालिकेत बदली होण्याआधी तुकाराम मुंढे एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर होते. तत्कालीन फडणवीस सरकारने त्यांची एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर नियुक्ती केली होती. मुंढे यांच्या जागी राधाकृष्णन बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कर्तव्य बजावलेला सात महिन्यांचा काळ माझ्यासाठी खूप काही शिकविणारा ठरला. कोविड महामारीच्या निमित्ताने मनपा आयुक्त म्हणून जे अधिकार प्राप्त झाले, त्या अधिकारांचा उपयोग उत्तम पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी कठोर निर्णय घेतले. त्यावर टीका झाली. मात्र, प्रत्येक निर्णय हा जनतेच्या भल्यासाठी घेतला याचे समाधान नक्कीच आहे. या काळातील अनुभव आयुष्यभरासाठी शिदोरी म्हणून कामात येईल, यात शंका नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.