देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला सूचक इशारा, म्हणाले…

मीरारोड: पोलीसनामा ऑनलाईन – तीन नापास झालेले विद्यार्थी हे मेरिटमध्ये आल्यासारखे राज्यात सत्ता भोगत असून लोकशाहीची थट्टा चालवल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि.5) महाविकास आघाडी सरकारवर केली. तसेच आम्ही पासा पलटवू आणि त्यासाठी आम्हाला शिडीची देखील गरज लागणार नसल्याचे सूचक वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे. फडणवीसांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात आगामी काळात भूकंप होणार की काय, याची चर्चा रंगू लागल्या आहेत.

मीरा भाईंदर महापालिकेच्या मीरारोड येथे उभारल्या जाणाऱ्या स्वर्गीय प्रमोद महाजन कला दालनाचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते झाले. शिवाय देशातील पहिली 68 मीटर उंचीची अग्निशमन दलात दाखल झालेल्या टर्न टेबल लॅडरचे लोकार्पण व बीएसयुपी योजनेतील गाळे धारकांना चाव्यांचे वाटप करण्यात आले. फडणवीस म्हणाले की , प्रमोदजी महाजन यांनी राजकारणात आम्हाला घडवले. नेतृत्व, वक्तृत्व व कर्तृत्व काय असते ते त्यांनी आम्हाला शिकवले आहे. प्रमोदजी केवळ राजकारणीच नव्हे तर सिनेमा, नाटक, साहित्यमध्येसुद्धा जाणकार होते. कलासक्त व कलेमध्ये रुची असलेले प्रमोद महाजन यांचे नाव असलेले कलादालनाच्या भूमिपूजन करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी पालिकेचे आभार मानले.

देशात देवेगौडा व गुजराल यांचे सरकार असताना रमाकांत खलप हे त्यांच्या पक्षाचे एकच खासदार असून मंत्री होते. एकदा चिनी शिष्टमंडळ आले असताना त्यांनी लोकशाही बद्दल विचारणा केली. त्यावेळी महाजन यांनी सर्वात मोठा पक्ष भाजपा विरोधी पक्षात आहे व अन्य प्रमुख पक्षांनी सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आहे अशी त्यावेळच्या लोकशाहीचे विडंबन झाले होते ते विशद केले होते, त्याची आठवण करून देत सध्या महाराष्ट्रात देखील वेगळी परिस्थिती नसल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी खासदार पूनम महाजन, महापौर ज्योत्सना हसनाळे, आमदार रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे उपस्थित होते.