पाळीव कासवाचा 20 मजल्यावरुन पडून मृत्यू, मालकाविरुद्ध FIR दाखल

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन –  एका परदेशी जातीच्या कासवाचा 20 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कासव पाळणाऱ्या व्यक्ति विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ठाण्यातील बाळकुम परिसरात 1 मे रोजी दुपारी घडला. याप्रकरणी प्लांट अँड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीच्या सदस्याने कापूरबावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्लांट अँड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायचीचे मानद सदस्य सुनीष कुंज यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादेवरुन पोलिसांनी कासव पाळणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुनीष कुंज यांच्या माहितीनुसार मृत कासव हे परदेशी प्रजातीचे होते.

सुनीष कुंज यांच्या तक्रारीनुसार, बाळकूम परिसरातील हायलँड हेवनमधील कोरल इमारतीत 20 मजल्यावर राहणाऱ्या एका व्यक्तीने कासव पाळले होते. 1 मे या दिवशी दुपारी कासव घरातील सज्जातून खाली पडले. यामध्ये कासवाचा मृत्यू झाला. कासव खाली पडून त्याचा मृत्यू झाला तरी संबंधित व्यक्ती कासवाला पाहण्यासाठी इमारतीच्या खाली उतरली नाही. एका सफाई कामगाराने या कासवाची विल्हेवाट लावली.

सुनीष कुंज यांच्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणी कापूरवाबडी पोलीस ठाण्यात कासव पाळणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या व्यक्तीने हे कासव घरात पाळले होते. त्याने कासवाची योग्य प्रकारे काळजी न घेतल्याने ते कासव घराच्या सज्जातून खाली पडले आणि त्याचा मृत्यू झाला. असे तक्रारीत म्हटले आहे.