कौतुकास्पद ! वडिलांनी केलेल्या कष्टाचं झालं चीज, गवंडयाचा ‘लाडका’ बनला तहसीलदार

पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला आहे. मुख्य परीक्षेसाठी ६ हजार ८२५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून १ हजार ३२६ विद्यार्थी हे मुलाखतीसाठी निवडण्यात आले होते. त्यातून ४२० जणांची अधिकारी म्हणून निवड करण्यात येणार आहे. दरम्यान, यात अहमदनगर मधील पारनेर तालुक्यातील अळकुटी म्हस्केवाडी रोड बहिरोबावाडी येथील तुषार निवृत्ती शिंदे यांची तहसीलदार पदी वर्णी लागली आहे. सध्या ते चंद्रपूर नगरपरिषदेमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

तुषार यांच्या वडिलांचा बांधकाम करण्याचा व्यवसाय, त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. पण या सर्व परिस्थितीवर मार करत तुषार यांनी MPSC मुख्य परीक्षेत बाजी मारली आहे. शिक्षण करताना तुषारला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. परंतु, त्यांनी जिद्द सोडली नाही. त्यामुळे तुषारची जिद्द आणि मेहनतीचं फळ मिळाल्याची भावना गावकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच तुषार यांनी मिळवलेल्या यशाने कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला असल्याचं गावकऱ्यांनी म्हटलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून तहसीलदारपदी निवड झाल्यामुळे शिंदे कुटुंबीयांची मान उंचावली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तुषारचे वडील निवृत्ती नथू शिंदे यांनी सांगितलं की, अनेक परिस्थितीला तोंड दिले. अनेक जीवनात चढ उतार आले. पण त्यांनी कधी जिद्द सोडली नाही. आज तो तहसीलदार झाला याचा आम्हाला व पूर्ण अळकुटीकरानां वाटतो.

प्रसाद चौगुले राज्यात पहिला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये साताऱ्याचा प्रसाद चौगुले हा सर्वसाधारण वर्गातून ५८८ गुण घेऊन राज्यात पहिला आला आहे. महिला वर्गवारीतून अमरावती जिल्ह्यातील पर्वती पाटील पहिली आली आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील रवींद्र शेळके हा विद्यार्थी मागासवर्गीयांमधून पहिला आला आहे.