दानवे-खोतकर संघर्ष आ. सत्तार देणार ‘या’ नेत्याला साथ 

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – जालन्यातील राजकारण सध्या मराठवाड्याचाच नाही तर एकंदर महाराष्ट्राचा चर्चेचा विषय ठरतोय कारण दानवे-खोतकर यांच्यातील शीतयुद्ध सगळ्यांनाच माहिती आहे, किंबहुना सगळ्यांनी ते पाहिले ही असेल कारण एका माध्यमामध्ये चर्चा सत्रामध्ये दोघेही सहभागी झाल्यांनतर टेलिव्हिजन वरच या दोघांमध्ये वाद रंगला होता. त्याच चर्चेत मी तुम्हाला पाडून राहील मग त्यासाठी काहीही का करावं लागेना.

जालन्याच्या राजकीय आखाड्यात सध्या हे दोघे भिडले आहेत. खोतकरांच्या जोडीला सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनीसुद्धा दानवेंना पराभूत करण्यासाठी खोतकरांना मदत करू, तसेच माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्यात आणि दानवेनमधे जुने भांडण असल्यामुळे मी माझा पूर्ण पाठिंबा खोतकरांना देईल आणि एका सभेत बोलताना ते म्हणाले होते की यावेळेस जालन्यात कमळ उमलू देणार नाही.

त्यामुळे दानवे मात्र मोठ्या अडचणीत सापडल्याचे दिसत आहे, तर औरंगाबाद लोकसभा खासदार चंद्रकांत खैरे हे दानवेचे जुने मित्र आहे, एरव्ही खैरे दानवेना पाठिंबा देत ही असतील, पण जर शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांनी जालन्यातून लोकसभा लढवली तर मात्र खैरेंना नाईलाजाने दानवेच्या विरोधात प्रचार करावा लागेल.

खोतकर गेल्या काही दिवसांपासून दानवेंच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढण्याची तयारी करताना दिसतात. परवा तर मुख्यमंत्र्यांनी दोघांच्या भांडणात मध्यस्थी करून भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु खोतकर माघार घ्यायला तयार नाहीत. माघार घेतली तर ती राजकीय आत्महत्या ठरेल असे ते म्हणतात.

या राजकीय संघर्षाला २०१६ ची जिल्हा परिषद निवडणूक कारणीभूत आहे. भाजपचे २२ उमेदवार निवडून आले असताना खोतकरांनी शिवसेना-काँग्रेस अशी युती करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. त्यांची ही खेळी दानवेंच्या जिव्हारी लागली. कारण त्यांची कन्या आशा मुकेश पांडे या जि.प.अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार होत्या. त्यामुळे हे अपयश त्यांनी वैयक्तिक घेतले. पुढे बाजार समितीतही त्यांनी भाजपला फारसे स्थान दिले नाही.

दुसरीकडे दानवेंनी जिल्हा व जालना शहरात विविध योजना आणून खोतकरांना शह देण्याचा प्रयत्न केला जिल्हाभर रस्त्याची कामे हाती घेतली. ड्राय पोर्ट, रसायन संस्थासारखे महत्त्वाचे प्रकल्प आणले. कामाचा झपाटा दाखवून दिला. राजकारणाचा विचार केला, तर भोकरदन, बदनापूर या तालुक्यांवर त्यांचे राजकीय वर्चस्व आहे. तरी भोकरदनमध्ये कुठेतरी सत्तेच्या केंद्रीकरणावर नाराजी दिसते. त्यांच्या मतदारसंघात औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघ येतो. आजवर त्यांचे व अब्दुल सत्तार यांचे ‘आतून’ साटेलोटे होते.

दोघेही एकमेकांना रसद पुरवत असत; पण अचानक काय बिघडले याची वाच्यता झालेली नाही; पण आज दोघेही एकमेकांच्या विरोधात दिसतात. सत्तार यांनी निश्चय केलाआहे. पण या दोघांच्या भांडणावर सामान्य माणसाचा विश्वास नाही. वेळेवर दोघे हातमिळवणी करतील, असे त्यांना वाटते. मुख्यमंत्र्यांनी परवा दोघांनाही जाहीरपणे समजुतीच्या चार गोष्टी सांगितल्या. त्या किती मनावर घेतल्या जातील, याचा लवकरच उलगडा होईल.