लग्नाचं आमिष दाखवून ‘ज्योतिष’ महिलेवर बलात्कार ; TV अभिनेत्यावर गुन्हा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी मुंबईतील एका टिव्ही अभिनेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कारानंतर तिचा व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करत तिच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी ओशीवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

बलात्काराचे चित्रिकरण करून ब्लॅकमेल

पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार, दोघांची भेट ऑक्टोंबर २०१६ मध्ये एका मोबाईल अप्लिकेशनद्वारे झाली. त्यानंतर दोघेही चांगले मित्र बनले. एका दिवशी संबंधित टिव्ही अभिनेत्याने तिला आपल्या फ्लॅटवर बोलवले. तिला लग्नाचं वचन दिलं. मात्र त्यानंतर तिला नारळ पाणी पिण्यासाठी दिलं. ते पिल्यावर काही वेळाने महिलेला चक्कर आली. ती बेशुद्ध झाल्यावर त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडीओदेखील केला. त्यानंतर तो या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने वारंवार तिला ब्लॅकमेल करत पैसे उकळले. असे महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

लग्नाच्या तगाद्यामुळे धमकावले

दरम्यान तो तिला ब्लॅकमेल करत होता. तिला त्याने लग्नाचे वचनही दिले होते. परंतु काही दिवसांपुर्वी तिने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला. त्यावेळी त्याने तिला धमकी देत तुला काय करायचं ते कर असं म्हणत धमकावल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

गुन्हा दाखल

महिलेने याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ओशीवरा पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार, बळजबरीने पैसे उकळणे यासह काही कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.