चाहत्यानं कपिल शर्माच्या नावावरून ठेवलं मुलीचं नाव ! ‘कॉमेडीयन’नं ‘असं’ केलं React

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  आता हळूहळू सर्वकाही अनलॉक होत असताना तब्बल 4 महिन्यांनंतर टीव्हीवरील फेमस शो द कपिल शर्मा शोची शुटींग सुरू झाली आहे. सरकारनं घालून दिलेल्या नियमांचं पालन करतच शोची शुटींग सुरू आहे. हा शो करणाऱ्या कपिल शर्माची प्रचंड फॅन फॉलोविंग आहे. अशात सिडनीला राहणाऱ्या कपिल शर्माच्या एका चाहत्यानं कपिलच्या नावावरून त्याच्या मुलीचं नाव ठेवलं आहे. कपिल शर्माला हे कळाल्यानंतर त्यानं ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या सिडनीतील रहिवाशी असणाऱ्या या चाहत्यानं आपल्या गोंडस मुलीचं नाव कोपिला ठेवलं आहे. एका युजरनं कपिल शर्माला टॅग करत ट्विट केलं की, “ऑस्ट्रेलियातील सिडनीत राहणाऱ्या माझ्या भावाच्या मुलीचं नाव ठेवण्याचा कार्यक्रम झाला. तो म्हणाला की, माझी इच्छा आहे की, तू कपिल शर्मासारखं बनावं. तुझं नाव कोपिला असेल. जेव्हा मी भावाला विचारलं की, ऑस्ट्रेलियात हे नाव का. तेव्हा तो म्हणाला, मला माहितीये कपिल शर्मा जेवढा रिअल आहे त्याला कोणी रिप्लेस नाही करू शकत.”

कपिलनं हे ट्विट नोटीस केलं आणि त्या युजरच्या ट्विटला उत्तरही दिलं. कपिलनं लिहिलं की, लिटिल कोपिलाला खूप सारं प्रेम. देव तिला आशीर्वाद देवो. कुटुंबाला माझ्या शुभेच्छा.”