COVID-19 : 5 दिवसांपासून ‘कसौटी जिंदगी की’ मधील अभिनेत्रीचा ‘कोरोना’ टेस्टसाठी संघर्ष ! सांगितलं दिल्लीतील हॉस्पिटलचं ‘भयानक’ सत्य

कसौटी जिंदगी की 2 या मालिकेत शिवानी शर्माची भूमिका साकारणारी अभिनेत्री चारवी सराफ हिला दिल्लीत कोरोना टेस्ट करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तिनं खुलासा केला आहे की, तिच्यात Covid-19 ची लक्षणं आहेत. परंतु कोणतीही लॅब तिची कोरोना टेस्ट करण्यासाठी तयार नाही. तिनं एक खुलं पत्र लिहित तिचा अनुभव सांगितला आहे.

आपल्या पत्रात चारवीनं लिहिलं की, “माझ्यात Covid-19 ची लक्षणं आहेत. परंतु दिल्लीत कोरोना टेस्ट करणं खूप अवघड झालं आहे. आम्ही लॉकडाऊनमुळं होमबाऊंड आहोत. सर्व काही ठिक होत. गेल्या आठवड्यात मला अस्वस्थ वाटू लागलं. माझ्या शरीराचं तापमान सतत कमी होऊ लागलं. नंतर मला खूप ताप आला. श्वास फुलू लागला. अंग दुखू लागलं. घसा आणि डोकं दुखू लागलं. मला वाटलं की मला कोरोना झालं आहे. मला खूप भीती वाटली. मी माझ्या कुटुंबासाठीही घाबरले होते. मी टेस्ट करण्यासाठी खूप प्रयत्न केले जे वाया गेले. भीतीपोटी मी स्वत:ला क्वारांटाईन केलं.”

चारवी पुढे म्हणाली, “माझ्या मनात होतं की, Covid-19ची टेस्ट करावी. परंतु मला कुठे माहिती होतं की, कोरोना टेस्ट करणं एवढं अवघड असेल. अनेक वर्षांपासून आम्हाला सेवा देणाऱ्या डॉक्टरांनीही सांगितलं की, त्यांच्याकडे कोरोना टेस्ट किट नाहीये. नंतर मी काही खासगी हॉस्पिटलला कॉल केला. परंतु त्यांनी देखील कोणतीही सुविधा नाही असं सांगत कोरोना टेस्ट करण्यासाठी नकार दिला. मी काही सरकारी हॉस्पिटलला कॉल केला तर त्यांनी सांगितलं हे व्हायरल असू शकतं. त्यांनी मला माझ्या डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला. Covid-19 च्या हेल्पलाईनला देखील मी संपर्क साधला त्याचाही काही उपयोग झाला नाही. एका टेस्टसाठी मला खूप हताश व्हावं लागलं.”