‘लागिरं झालं जी’ मालिकेतील ‘त्या’ कलाकारांना 16 लाखांचा गंडा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘लागिरं झालं जी’ ही झी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका आहे. याच मालिकेतील कलाकारांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या मालिकेतील कलाकारांना 16 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. फास्टर राहुल्या आणि स्लोअर राहुल्या अशी भूमिका कराणाऱ्या कलाकरांच्या बाबतीत हा प्रकार समोर आला आहे. फास्टर राहुल्याची भूमिका करणारा केशव उर्फ राहुल उत्तम जगताप आणि स्लोअर राहुल्याची भूमिका करणारा राहुल संभाजी मगदूम अशी यांची नावे आहेत.

या फसवणुकीप्रकरणी अमरावती जिल्ह्यात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमरावतीत राहणारे संतोष जामनिक उर्फ अक्षय मिश्रा आणि विलास जाधव अशी फसवणूक करणाऱ्या संशियातांची नावे आहेत.

राहुल जगताप आणि राहुल मगदूम कोल्हापूरला सैन्य भरतीसाठी गेले होते. तीन वर्षांपूर्वीची ही घटना आहे. कोल्हापूरला सैन्य भरतीसाठी गेले असता त्या दोघांची भेट भोसेमधील कृ्ष्णदेव पाटीलशी झाली. त्याच्याशी ओळख झाल्यानंतर या तिघांची नोकरीविषयी चर्चा झाली. यावेळी कृष्णदेव त्यांना म्हणाला की, “अमरावतीत दोघेजण माझ्या ओळखीत आहेत. त्यांच्या मदतीने तुम्हाला नोकरी मिळू शकते” असा दावा कृष्णदेवने केला. आपल्याला सरकारी बँकेत नोकरी मिळते आहे म्हणून हे दोघेही खुश झाले. परंतु ही नोकरी देण्याच्या मोबदल्यात दोघांनी प्रत्येकी आठ लाख देण्याचे कबुल केले. राहुल जगतापने धनादेश दिला तर राहुल मगदुम याने एक लाख रुपये रोख दिले होते. यानंतर तब्बल तीन वर्षांपासून हे दोघे संशयितांना आणि त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या खात्यावर रक्कम पाठवत होते. अशा प्रकारे थोडे थोडे करून या दोघांनी तीन वर्षांत प्रत्येकी 8 लाख म्हणजे एकूण 16 लाख संशयितांच्या खात्यावर जमा केले.

पैसे जमा केल्यानंतर काही दिवसांनी जगताप आणि मगदुम या दोघांनीही नोकरीसंदर्भात विचारणा सुरु केली. परंतु संशयितांकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. त्यानंतर दोघांनाही आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. यानंतर राहुल जगताप याने तात्काळ पोलिसात धाव घेतली. सर्व प्रकार पोलिसांनी सांगत जगताप याने पोलिसात तक्रार दाखल केली.