धक्कादायक ! बालभारतीची ‘बनावट’ पुस्तके बाजारात !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बालभारतीच्या बारावीच्या पुस्तकांची विक्री यंदा जवळपास 50 टक्क्यांनी घटली आहे. बालभारतीच्या पुस्तकांसारख्याच हुबेहुब दिसणार्‍या बनावट पुस्तकांची विक्री आणि पुस्तकांच्या पीडीएफ डाऊनलोड करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे बालभारतीला फटका बसल्याचे समोर आले आहे.

कोरोना प्रादूर्भावाच्या काळातही बालभारतीतील कर्मचारी, शैक्षणिक, तांत्रिक विभागातील अधिकारी यांनी खूप परिश्रम करून बाजारात पुस्तके उपलब्ध केली. पुस्तकांच्या प्रतिक्षेत असलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. जून अखेरीस बालभारतीची पुस्तके उपलब्ध झाली. गेल्यावर्षी अकरावीची पुस्तके बदलली. त्यावेळी सर्व विषयाच्या पुस्तकांच्या मिळून साधारण 78 लाख प्रती विकल्या गेल्या. हेच विद्यार्थी यंदा बारावीत गेले. अकरावीपेक्षा बारावीच्या पुस्तकांची विक्री काहीशी अधिक होते.

मात्र यंदा बारावीच्या नव्या पुस्तकांच्या अद्यापपर्यंत 38 लाख प्रतींचीच विक्री झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये बनावट पुस्तकांची विक्री होत असल्यामुळे बालभारतीच्या पुस्तकांचा खप कमी बोलले जात आहे. बालभारती गेल्या काही वर्षांपासून पाठयपुस्तके पीडीएफ स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध करून देते. यंदाही पाठयपुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे पीडीएफ स्वरूपातील पुस्तके पाहणार्‍यांचे प्रमाण वाढले.

मात्र, तरीही पुस्तके उपलब्ध झाल्यानंतर पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा कल हा प्रत्यक्ष छापील प्रती घेण्याकडे अधिक असतो. त्यामुळे पुस्तकांच्या विक्रीत फरक पडला तरी तो 10 ते 15 टक्केच पडणे अपेक्षित आहे, असे विभागातील एका अधिकार्‍याने सांगितले.