धक्कादायक – जास्त लाड होत असल्याने 5 मिनीटे मोठ्या भावाचा खून

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्यापेक्षा जास्त लाड केले जात असल्याच्या न्यूनगंडातून पाच मिनिटे मोठ्या असलेल्या जुळ्या भावाचा झोपेत असताना डोक्यात हातोडा घालून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. औरंगाबादच्या कैलासनगर भागात हा प्रकार मंगळावारी दुपारी उघडकिस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे तो उठून परत वार करेल म्हणून सतत त्याच्या डोक्यात हातोड्याने मारत राहिला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर (नाव बदलेलं आहे) आणि राज ( नाव बदलेलं आहे)  हे दोघे जुळे भाऊ आहेत. समीर हा राजपेक्षा पाच मिनीटांनी मोठा आहे. तो खाराकुंआ भागातील एका शाळेत इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता. रिक्षाचालक असलेल्या त्याच्या वडीलांचे दहा वर्षांपुर्वी निधन झाले आहे. तेव्हापासून त्याची आई वृत्तपत्र विकून आपला उदरनिर्वाह करत होती. दोघा भावंडांमध्ये समीर हुशार होता. त्यामुळे घरातील सर्व सदस्य  व शिक्षकांचा तो लाडका होता. त्यातूनच राजचा न्यूनगंड वाढत गेला.

त्याची आई दोन ते तीन दिवसांपुर्वी लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेली होती. त्यानंतर मंगळवारी दुपारी दोघांनी नळाचे पाणी भरले. काही वेळाने समीर पलंगावर झोपला. तो झोपलेला असताना राजने त्याच्या डोक्यात हातोड्याने वार केले. समीर उठून परत वार करेल म्हणून त्याने त्याच्यालर आणखी वार केले. यात समीर जागीच ठार झाला. त्यानंतर राज एका क्लासच्या दिशेने पळत सुटला. याची माहिती नागरिकांनी पोलिसांना कळविले. जिन्सी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी समीर झोपलेल्या पलंगावर तसेच आजूबाजूला रक्ताचा सडा पडलेला होता. पोलिसांनी राजला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.