बगदादामध्ये आत्मघातकी हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू तर 40 जण जखमी

बगदाद : वृत्तसंस्था –  इराकची राजधानी बगदादमध्ये (Baghdad) आत्मघातकी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू झाला आहे तर 40 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या बॉम्ब हल्ल्यामुळे बगदाद शहर हादरुन गेले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन हल्ले करण्यात आले असून यामध्ये जखमी झालेल्या अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल बगदादच्या कमर्शियल सेंटरमध्ये हे दोन स्फोट झाले आहेत. हे आत्मघातकी हल्ले असल्याची माहिती मिळत असून हा एवढा मोठा स्फोट होता की याचा आवाज तायारान स्वायरपर्यंत ऐकू आला. ज्या ठिकाणी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्याच भागात हा हल्ला करण्यात आला आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली नसल्याचे, एका हिंदी वेबसाईटने म्हटले आहे.

बगदादमध्ये मागील वर्षी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला झाला होता. या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन रॉकटने हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांना आग लागली होती. तर टॉप कमांडरचा मृत्यू झाला आणि अनेक सैनिक जखमी झाले होते. बगदादमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर इराण समर्थक मिलिशियाकडून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हल्ला करण्यात आला होता. अमेरिकेसोबत तणाव निर्माण झाल्यानंतर हा हल्ला करण्यात आला होता.