देवाची करणी अन्…! भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी; दोन्ही तोंडांनी पिते दूध

नवी दिल्ली : वृत्त संस्था – ओडिशातील केंद्रपाडा येथे रविवारी सकाळी एका महिलेने खाजगी नर्सिंग होममध्ये मुलीला जन्म दिला. पण या मुलीला दोन डोके, तीन हात असल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुलीच्या दोन्ही चेहऱ्याचे नाक, तोंड पूर्णपणे विकसित आहे. या बाळाला दोन्ही तोंडांनी आहार दिला जात आहे. तसेच हे बाळ दोन्ही नाकातून श्वासही घेत आहे.

केंद्रपाडा येथील एका खाजगी रुग्णालयात सिजेरियन ऑपरेशन करून मुलीचा जन्म दिला. त्यानंतर त्या महिलेला आणि तिच्या बाळाला केंद्रपाडा येथील डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे बाळ आणि तिच्या आईला वैद्यकीय देखभालीसाठी कटकच्या सरदार वल्लभभाई पटेल पीजी इन्स्टिट्यूट ऑफ पेडियाट्रिक्स नेण्यात आले. सध्या या बाळाची प्रकृती स्थिर आहे. या मुलीचे आई-वडील राजनगर क्षेत्रातील कानी गावात राहतात.

याबाबत केंद्रपाडाचे पेडियाट्रिक कन्सल्टंट डॉ. देबाशीष साहू यांनी सांगितले, की ‘ही एक असामान्य घटना आहे. पण आता असे प्रकार घडत असून, लोक जागरूक झाले आहेत. मात्र, अजूनही काही ग्रामीण भागातील महिला वेळेवर औषधोपचार करत नाही. या महिला फोलिक ऍसिड औषधे घेणे बंद करतात आणि त्यानंतरच्या स्टेजमध्ये अल्ट्रासाउंडही करत नाही. त्यामुळे विसंगतीची माहिती मिळू शकते.

दरम्यान, मुलीच्या वडिलांनी ओडिशा सरकारला मुलीच्या वैद्यकीय उपचारासाठी मदतीची विनंती केली आहे. यापूर्वी कंधमालने जोडले गेलेल्या ट्विन्सला वेगळे करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. एम्स दिल्लीत ही शस्त्रक्रिया झाली होती. या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च ओडिशा सरकारने उचलला होता.