Coronavirus : महाराष्ट्रातील ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या 1078 वर, ‘मास्क’ वापरण्याबाबत सांगितल्या ‘या’ 5 महत्वाच्या सूचना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन :  महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या प्रकरणांत झपाट्याने वाढ होत असून संक्रमित रुग्णांची संख्या १,०७८ वर पोहोचली आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, लॉकडाऊनमुळे झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो, परंतु आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. यादरम्यान, मुख्यमंत्र्यांनी लोकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ५ मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून लोकांना काटेकोरपणे त्यांचे अनुसरण करण्यास सांगितले गेले आहे जेणेकरुन कोरोना विषाणूचा संसर्ग होण्यापासून रोखता येईल.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी या सूचना जारी करत म्हंटले कि, कोरोना साथीच्या रोगात, नियमांचे पालन करण्याची आणि सामाजिक अंतर राखत काळजी घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. यासाठी साथीच्या रोग अधिनियम १८९७ च्या नियम क्रमांक १० अंतर्गत काही सूचना दिल्या जात आहेत.

काय आहेत सूचना ?

१. जर तुमच्यापैकी कोणी एखाद्या हेतूने किंवा काही कारणास्तव रुग्णालय, कार्यालय, बाजार किंवा सार्वजनिक ठिकाणी जात असेल तर त्यांनी मास्क लावून बाहेर पडावे.

२. जरी एखादा ऑफिसच्या कारमध्ये किंवा त्याच्या वैयक्तिक कारमधून प्रवास करत असेल तरीही, मास्क घालणे अनिवार्य आहे.

३. एखादी व्यक्ती साइट / ऑफिस / इतर ठिकाणी काम करत असली तरीही मास्क घातलेला असावा.

४. कोणतीही व्यक्ती मास्क न घालता कोणत्याही मिटिंग किंवा लोक असलेल्या ठिकाणी जाऊ शकत नाही.

५. हे स्टॅंडर्ड मास्क आहेत जे कोणत्याही मेडिकल दुकानात सहज उपलब्ध होतील. परंतु, जर ते उपलब्ध नसतील तर आपण घरी देखील मास्क बनवून घालू शकता. होममेड मास्क वॉशेबल असतात जेणेकरून ते पुन्हा घातले जाऊ शकतात.

यात पुढे असेही लिहिले आहे की, या सूचनांचे उल्लंघन करणारा कोणी आढळल्यास त्याच्याविरूद्ध कलम १८८ अन्वये कारवाई केली जाईल. या प्रकरणात, त्याला तुरुंगवास आणि दंडही होऊ शकतो. त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आवाहन केले की, जेव्हा ते घराबाहेर पडतात तेव्हा त्यांनी मास्क घालावे. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय क्षेत्रात अनुभवी सेवानिवृत्त लष्करी जवान, परिचारिका, वॉर्ड बॉय यांना पुढे येण्याचे आवाहन केले आणि म्हणाले की, महाराष्ट्राला तुमची गरज आहे.

दरम्यान, बुधवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूची ६० नवीन प्रकरणे नोंदविली गेली असून संक्रमित रुग्णांची संख्या १,०७८ झाली आहे.तर ६४ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ६० नवीन रुग्णांपैकी ४४ रुग्ण मुंबई, ९ पुण्यात, ४ नागपुर, आणि अहमदनगर, अकोला, बुलढाणा येथे प्रत्येकी एक जणांची नोंद आहे.