समलैंगिक संबंधांवर भाष्य करणारा ‘हा’ चित्रपट ठरतोय विशेष कौतुकास पात्र कारण की….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – समलिंगी संबंधांवर आधारित ‘३७७ अब नॉर्मल’ चित्रपट ZEE5 वर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. एका वेगळ्याच विषयावर आधारित असणारा हा चित्रपट नेटकऱ्यांना आवडला असून सध्या सोशल मीडियावर त्याच भरभरून कौतुक होत आहे. कारण कलम ३७७ रद्द करण्यासाठी कशा प्रकारे लढा देण्यात आला आणि कशा प्रकारे भारत या ऐतिहासिक निर्णयाचा साक्षीदार झाला, हे सांगणारा ‘३७७ अब नॉर्मल’ एक प्रगल्भ विषय हाताळत आहे. समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी दाखल केलेली याचिका आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयापर्यंतचा प्रवास या चित्रपटात अधोरेखित करण्यात आला आहे. १३ मार्च रोजी याचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यालाही सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला होता.

सप्टेंबर २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७७ रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. या निर्णयाचं साऱ्या देशातून स्वागत करण्यात आलं. जगातील विविध ठिकाणी असणाऱ्या एलजीबीटी समुदायासाठी काम पाहणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनीही या निर्णयाचं स्वागत केलं. पण, आनंदाचा आणि सकारात्मकतेचा हा लढा तितका सोपा नव्हता. हा दिवस पाहण्यासाठी अनेक अडथळे, विरोधांचा सामना एलजीबीटी समुदायाला आणि याचिकाकर्त्यांना करावा लागला होता. याच सर्व प्रसंगावर भाष्य करणारा ”३७७ अब नॉर्मल’ हा चित्रपट १९ मार्चला रिलीज झाला आहे. हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर आणि अनेक स्तरांमध्ये दाद मिळवत आहे.

या चित्रपटात मानवी गग्रू, तन्वी आझमी, झिशान आयुब, कुमुद मिश्रा आणि शशांक अरोरा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या कलाकारांच्या अभिनयालाही प्रेक्षकांनी विशेष दाद दिली आहे . एकूणच भारतीय कलाविश्वात चौकटी बाहेरचे आणि अतिसंवेदनशील विषयही किती शिताफीने हाताळले जातात याची प्रचिती या चित्रपटाने दिली आहे.

You might also like