Best CM : जय महाराष्ट्र ! कोरोनाची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरेंना मिळाली पहिली पसंती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात हाहाकार माजवला होता. कोरोना काळात योग्य नियोजन केले नसल्याचा आरोप विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला. असे असताना एका ज्येष्ठ पत्रकाराने ट्विटरवर घेतलेल्या पोलमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोनाची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळण्यात पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री ठरले आहेत. उद्धव ठाकरे यांना पहिल्या पसंतीची मतं मिळाली आहे. त्यांना सर्वाधिक म्हणजे 62 टक्क्याहून अधिक मतं मिळाली आहे. साध्या शिवसैनिकांकडून या ट्विटचे स्क्रिनशॉर्ट प्रचंड व्हायरल केले जात आहेत.

ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांनी नुकतेच ट्विटरच्या माध्यमातून कोरोना कालावधीत सर्वात चांगल्या पद्धतीने काम करणारे देशातील मुख्यमंत्री कोण होते हे जाणून घेण्यासाठी ट्विटरवर जनमत चाचणी घेतली होती. यामध्ये कोणत्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या कालावधीमध्ये सर्वोत्तम नियोजन केले ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. प्रभू चावला यांनी दोन पोल घेतले होते. एका पोलला चार पर्याय देण्यात आले होते. त्यांनी दोन पोल घेऊन आठ मुख्यमंत्र्यांविषयी जनमत चाचणी घेतली होती.

पहिल्या पोलमध्ये 2 लाख 67 हजार 248 जणांनी आपले मत नोंदवले. त्यापैकी 62.5 टक्के मतं ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मिळाली. म्हणजेच उद्धव ठाकरे यांना 1 लाख 67 हजार 30 मतं मिळाली आहेत. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 31.6 टक्के तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 4.6 टक्के आणि केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना 1.3 टक्के मत मिळाली. म्हणजे योगी आदित्यनाथ यांना 84 हजार 450 मतं मिळाली आहेत. केजरीवाल यांना 2 हजार 293 तर विजयन यांना 3 हजार 474 मते मिळाली आहेत.

दुसऱ्या पोलमध्ये एकूण 2 लाख 34 हजार 261 जणांनी आपली मतं नोंदवली आहेत. यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना सर्वाधिक मतं मिळाली आहेत. चौहान यांना 49 टक्के मतं मिळाली आहेत. त्या खालोखाल ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना 48.5, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना 1.7 तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना केवळ 0.5 टक्के मतं मिळाली आहेत. एकूण मतांपैकी शिवराजसिंह चौहान यांना 1 लाख 14 हजार 788 मतं मिळाली आहेत. त्या खालोखाल पटनायक यांना 1 लाख 13 हजार 616, अमरिंदर सिंग यांना 3 हजार 982 तर येडियुरप्पा यांना फक्त 1171 मतं मिळाली आहेत.